Join us
Daily Top 2Weekly Top 5

समय रैनावर मुकेश खन्नांचा पलटवार; म्हणाले "त्याची गाढवावरून धिंड काढली पाहिजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:29 IST

मुकेश खन्ना यांनी समयवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कॉमेडियन समय रैना काही दिवसांपूर्वी त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमामुळे अडचणीत सापडला होता. या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यानंतर समयविरोधात याचिका दाखल झाली आणि सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. त्यावेळी मुकेश खन्ना यांनीसुद्धा समयवर टीका केली होती. याच टीकेवर आता समयने त्याच्या 'स्टिल अलाईव्ह' व्हिडीओमधून मुकेश खन्ना यांना उत्तर दिलं. 'शक्तिमान' मालिका पाहून झालेल्या मुलांच्या मृत्यूला मुकेश खन्ना हे जबाबदार असल्याचे समयने म्हटले. या टीकेनंतर मुकेश खन्ना यांनी समयवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना यांनी लिहिलं, "कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच... समय रैनालाही शेपटी आहे. तुम्ही तिला कितीही मारलं किंवा सरळ केलं तरी ती पुन्हा वाकडी होते. कारण तो साधा प्राणी नाही. तो रोस्टेड प्राणी आहे. घाणीच्या आगीत भाजलेला, शिजवलेला. संपूर्ण देशानं त्याला शिव्या दिल्या, मारलं. मग तो पुन्हा मार खाण्यासाठी निर्लज्ज माणसासारखा परत आला. आता फक्त एकच गोष्ट उरली आहे. त्याचा चेहरा काळा करायला हवा, त्याला गाढवावर बसवून त्याची देशभरात धिंड काढायला पाहिजे, मुलांनी त्याच्यावर अंडी आणि टोमॅटो फेकायला हवेत, कारण त्यानं सुपरहिरो शक्तिमानचा अपमान केला आहे".

मुकेश खन्ना यांनी युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत समयच्या व्हिडीओला मिळणाऱ्या १०-१५ लाख व्ह्यूजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "व्ह्यूज मिळणे म्हणजे तुमचा आशय चांगला आहे असे नाही. मनोरंजनाच्या नावाखाली शिवराळ आणि अश्लील भाषेचा वापर करणे ही समाजासाठी लज्जास्पद बाब आहे. भारत 'विश्वगुरू' बनण्याचे स्वप्न पाहत असताना, अशा प्रकारचा कचरा तरुण पिढीला दाखवला जाणे दुर्दैवी आहे. मित्रांमध्ये खाजगीत विनोद करणे वेगळे, पण युट्यूब सारख्या सार्वजनिक व्यासपीठावर लोकांचा अपमान करणे ही बदनामी आहे".

समयने शक्तीमान या पात्रावर केलेल्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले की, "माझ्या पात्राची प्रतिमा इतकी भक्कम आहे की, अशा क्षुल्लक गोष्टींनी तिला धक्का लागणार नाही.  सत्याच्या विरोधात जाणाऱ्याचा अंत निश्चित असतो". शेवटी समय रैनाचे नाव घेत ते इशारा देत ते म्हणाले, "या माणसावर, ज्याचे नाव समय रैना आहे. कधी कारवाई होते याची मी वाट पाहत आहे. त्याचा 'समय' (काळ) आता संपवा".

काय म्हणाला समय रैना ?'स्टिल अलाईव्ह' व्हिडीओमध्ये समय म्हणाला की, "राजकारणी, सेलिब्रिटी, सुनील पाल, सगळेच माझ्या विरोधात बोलत होते. शक्तीमान (मुकेश खन्ना) सुद्धा माझ्या विरोधात बोलत होते, आपण शक्तिमानशी कसं लढू शकतो? 'सॉरी शक्तीमान,' ते म्हणत होते की, माझ्या कंटेंटचा मुलांवर काय परिणाम होईल. तुम्ही शक्तिमान किती पाहिलं आहे हे मला माहीत नाही, पण तुम्हाला आठवत असेल तर, तेव्हा शक्तिमान पाहिल्यानंतर मुलांनी छतावरून उड्या मारल्याच्या बातम्या आल्या होत्या. तुम्ही मुलांना मारलं आहे, तुम्ही कोणता धडा शिकवत आहात?" असं समयनं म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mukesh Khanna Retaliates Against Samay Raina; Calls for Public Humiliation

Web Summary : Mukesh Khanna demands action against Samay Raina for allegedly insulting Shaktimaan. He suggests publicly humiliating Raina, following Raina's criticism linking Shaktimaan to children's accidents. Khanna criticizes Raina's content and defends his character's integrity.
टॅग्स :मुकेश खन्ना