Join us  

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी शॉकिंग न्यूज, ‘तारक’नेच सोडला शो? हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:09 AM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : होय, तारक हे पात्र साकारणारे शैलेश लोढा (Sailesh Lodha) यांनी या मालिकेला रामराम ठोकल्याचं वृत्त आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )हा टीव्हीवरचा कॉमेडी शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. अगदी भारतातच नाही तर जगभर या शोचे चाहते आहेत. जेठालाल आणि तारक यांची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी. तुम्हीही या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, दिशा वकानी, नेहा मेहता, गुरूचरण सिंह यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय व महत्त्वपूर्ण अभिनेता 14 वर्षानंतर या शोमधून बाहेर पडणार असल्याचं कळतयं. त्याने शूटींगही बंद केल्याची खबर आहे. कोण आहे हा अभिनेता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं नाव शैलेश लोढा. होय, तारक हे पात्र साकारणारे शैलेश लोढा (Sailesh Lodha) यांनी या मालिकेला रामराम ठोकल्याचं वृत्त आहे. अर्थात याबाबत त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, 14 वर्षांपासून हा शो करणाऱ्या शैलेश लोढा यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी शूटींग केलेलं नाही आणि आता त्यांचा या शोमध्ये परतण्याचा कोणताही इरादा नाही.

हे आहे कारण?रिपोर्टनुसार, शैलेश लोढा आपल्या कॉन्ट्रॅक्टमुळे नाराज आहेत. शैलेश लोढा यांनी दिलेल्या तारखांचा योग्य वापर होत नसल्यामुळे देखील ते नाराज आहेत. या शोसाठी आत्तापर्यंत त्यांनी अनेक ऑफर्स सोडल्या. पण आता त्यांना आलेली संधी सोडायची नाही. नवे प्रोजेक्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. प्रॉडक्शन हाऊसने शैलेश लोढा यांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यांना शोमध्ये परत आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. पण कदाचित शैलेश लोढा यांचा शो सोडण्याचा निर्धार पक्का आहे. अर्थात अद्याप त्यांनी तशी ऑफिशिअल घोषणा केलेली नाही. शोच्या मेकर्सनेही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण एक मात्र नक्की की, शैलेश यांनी हा शो सोडल्यास चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

शैलेश लोढा सुरूवातीपासून या शोचा एक भाग आहेत. त्यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. जेठालाल व तारक यांची मैत्री पाहायला लोक सरावले आहेत.  काही दिवसांपूर्वी तारक मेहताच्या सेटवर शैलेश लोढा आणि जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अर्थात या सगळ्या अफवा असल्याचं शैलेश यांनी स्पष्ट केलं होतं.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार