'सारं काही तिच्यासाठी' आणि 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री वैशाली भोसले (Vaishali Bhosale) लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यावेळी ती मालिकेत नाही तर एका मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतेच तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं असून त्याचं डबिंगदेखील झालं आहे. आता तिने सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
वैशाली भोसले हिने सोशल मीडियावर नव्या प्रोजेक्टच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, ''सिनेमात मुख्य भूमिका करायची होती.प्राध्यापक सांगोरे सर यांच्या अष्टमी एंटरटेनमेंट निर्मित आदिशेष च्या निमित्ताने मुख्य भूमिका करण्याचे स्वप्न साकार झाले. माझा अभिनयाचा प्रवास ज्यांच्यामुळे सुरू झाला असे माझे गुरु राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक / दिग्दर्शक रमेश मोरे सरांसोबत काम करायला मिळणं यासारखा आनंद नाही. सरांनी फक्त सांगावं सिनेमा करतोय सरांचा असा एकही विद्यार्थी सापडणार नाही जो सरांना नाही म्हणेल. आणि ही संधी मला मिळाली त्यासाठी सर आणि विशेषत: यशश्री मॅम दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद. आजवर सरांनी आपल्या मातीतील, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे, मनाला भिडणारे, नातेसंबंधांवर भाष्य करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन करणारे २० हून अधिक सिनेमे केलेत.''
तिने पुढे म्हटले की, ''सरांच्या सिनेमाची सातासमुद्रपार दखल घेतली गेली. आजवर सर जरी प्रसिद्धी पासून दूर राहिले असले तरी येत्या काळात सरांचे वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करतील यात शंका नाही. आदिशेष हा सिनेमा आपल्या रूट्स वर आपले जे मूळ आहे त्यावर भाष्य करतो. कोकणच्या निसर्गरम्य ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग पार पडलं. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून एक उत्तम विषय उत्तम सिनेमा घेऊन येतोय. तुम्हीही त्याला भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो.''