Hina Khan-Rocky Jaiswal: अभिनेत्री हिना खान आणि रॉकी जैस्वाल यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली आहे. हिना गेल्या एक वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत आहे आणि या कठीण काळात रॉकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता हे दोघे 'पती पत्नी और पंगा' या कलर्सवरील शोमध्ये एकत्र दिसत आहेत. हिनामुळे रॉकीला प्रसिद्धी मिळतेय, अशी टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना रॉकीने सडेतोड उत्तर दिलं आहे.
रॉकी जैस्वालनं नुकतंच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यावेळी त्यानं सांगितलं की त्याला कधीच सेलिब्रिटी बनायचे नव्हते आणि तो हिनाच्या लोकप्रियतेचा फायदाही घेत नाहीये. रॉकी म्हणाला, "मला माहिती आहे की ती एक सेलिब्रिटी आहे. लोक म्हणतात की मी आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी हिनाच्या पदाचा किंवा पैशाचा वापर करतोय. मला तिच्या सेलिब्रिटी असण्याचा फायदा होतो. पण, म्हणून या कारणामुळे आम्ही एकत्र नाही आहोत. ट्रोल करणारे लोक तेच आहेत, ज्यांना माझ्यासारखं यश मिळवायचं आहे".
रॉकी जयस्वाल म्हणाला की, "हिनासोबत असल्यामुळे असुरक्षित वाटत नाही. मला माहित आहे की जर मी हिना खानसोबत कुठेही गेलो, तर लोकांचा प्रतिसाद तिच्याप्रती खूप मोठा असेल. कारण, लोकांचं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण, मी त्याबद्दल का राग बाळगावा. माझ्यासाठी एकच गोष्ट आयुष्यात अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे त्या व्यक्तीचा वेळ". त्याने पुढे सांगितले की, 'पती, पत्नी और पंगा' या शोने त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला मदत केली आहे. या शोमध्ये सहभागी झाल्याने त्याला एक वेगळा अनुभव मिळाला आहे.
दरम्यान, हिना आणि रॉकीसोबत 'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये अविका गौर-मिलिंद, रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी, स्वरा भास्कर-फहाद अहमद, सुदेश लहरी-ममता लहरी, गीता फोगट-पवन हे कलाकार दिसणार आहेत. या शोचं सूत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि मुनव्वर फारूकी करत आहेत.