सलमान खानचा बहुप्रतिक्षित शो 'बिग बॉस १९' लवकरच सुरु होणार आहे. यंदा शोमध्ये कोण कोण सेलिब्रिटी येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खानने प्रत्येक सीझनचं दमदार होस्टिंग केलं. आता यावेळीही तो आपला जलवा आणि स्वॅग दाखवणार आहे. घरातील सदस्यांना दम भरताना दिसणार आहे. यंदा शोमध्ये अभिनेत राम कपूर (Ram Kapoor) आणि त्याची पत्नी गौतमी कपूर येणार अशी चर्चा होती. या चर्चांवर स्वत: राम कपूरनेच उत्तर दिलं आहे.
'बिग बॉस १९'मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली आहे का? या प्रश्नावर अभिनेता राम कपूरने नुकतंच एका मुलाखतीत उत्तर दिलं. फिल्मीबीटशी बातचीत करताना तो म्हणाला, "मी कधीही बिग बॉसमध्ये जाणार नाही. भले त्यांनी मला २० कोटी जरी ऑफर केले तरी मी जाणार नाही. कारण तो शो माझ्यासाठी बनलेला नाही. म्हणजे तो शो वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. बिग बॉस शो खूप यशस्वी रिएलिटी शो आहे याची मला कल्पना आहे. पण माझा पॉइंट हा आहे की मी स्वत:ला एक अभिनेता मानतो. अशा प्रकारचे शो खूप यशस्वी झाले, मात्र यात जास्त गॉसिपच असतं. बिग बॉसच काय इतरही रिएलिटी शोमध्येही तेच असतं. यात काहीही नवं टॅलेंट पाहायला मिळत नाही. दुसरे लोक आयुष्य कसं जगतात एवढंच यात दाखवलं जातं."
तो पुढे म्हणाला, "आपापल्या जागी ते सगळं ठीक आहे. पण मला ते कंफर्टेबल वाटत नाही. मी खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर बिग बॉससाठी मी सर्वात वाईट सदस्य असेन. मी कधीच बिग बॉस मध्ये जाणार नाही. असे रिएलिटी शोज माझ्यासाठी बनलेले नाहीत."
'बिग बॉस' शो टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्तही शोही राहिला आहे. याच्या पुढील सीझनची तयारी सुरु झाली आहे. अद्याप या सीझनमध्ये सहभागी होणारे नावं समोर आलेली नाहीत. अनेकांना मेकर्सने यासाठी अप्रोच केले आहे.