पहलगामदहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी रात्री 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम राबवली. त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे एक भाषण सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झालं. याच भाषणाची खिल्ली 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेता राजेश कुमार (रोशेश) याने आपल्या खास विनोदी शैलीत उडवली आहे.
साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये राजेश कुमार यांनी रोसेश साराभाईची भूमिका साकारली होती. या टीव्ही शोमध्ये त्याची बोलण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी होती. आता लोकांच्या मागणीनुसार, राजेश यांनी रोशेश शैलीत बिलावल यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. शनिवारी राजेश कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये खास ढंगात बिलावल भुट्टो यांच्या भाषणाची नक्कल करताना दिसतो.
हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल ट्रेंड ठरत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनीही विविध कमेंट्स केल्यात. कुणी म्हटलं, "भारत माँ की जय", तर कुणी या व्हिडीओला "आयकॉनिक" असं म्हटलं.
बिलावल भुट्टो कोण आहेत?
बिलावल भुट्टो झरदारी हे एक पाकिस्तानी राजकारणी आहेत. ते पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष आणि बेनझीर भुट्टो यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०२२ ते २०२३ पर्यंत पाकिस्तानचे ३७ वे परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम पाहिले. १९८८ मध्ये कराची येथे जन्मलेल्या बिलावल यांनी पाकिस्तानात खूप कमी वेळ घालवला आहे. त्यांनी लंडन, दुबईमध्ये वास्तवय केलं आहे. त्यांनी तायक्वांदोमध्ये ब्लॅकबेल्ट देखील मिळवलेला आहे. बिलावल भुट्टो हे सातत्याने भारताविरोधात वक्तव्ये करत आले आहेत. पाकिस्तानला शांतता हवी परंतु जर भारताने आम्ही उकसवलं तर आम्ही युद्धासाठीही तयार आहोत. आम्हाला युद्ध नको परंतु जर कुणी आमच्या सिंधु नदीवर हल्ला केला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ अशा पोकळ धमक्या त्यांनी दिल्या होत्या.