Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘दिल ही तो है’ मालिकेतून पूनम ढिल्लोन करणार पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 10:55 IST

पूनम ढिल्लोन यांनी खूपच कमी वयात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ १६ वर्षांची असताना त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पूनम ...

पूनम ढिल्लोन यांनी खूपच कमी वयात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ १६ वर्षांची असताना त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पूनम या मिस इंडिया झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. एका मासिकावर पूनम यांचा फोटो झळकला होता. हा फोटो यश चोप्रा यांनी पाहिला आणि त्रिशुल या चित्रपटासाठी त्यांनी पूनम यांची निवड केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. पहिल्याच चित्रपटात संजीव कुमार, अमिताभ बच्चन या दिग्गजांसोबत झळकण्याची संधी पूनम यांना मिळाली होती. या चित्रपटात त्यांची जोडी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत जमली. त्या दोघांवर चित्रीत झालेले गुपुची गुपुची गम गम हे गाणे चांगलेच गाजले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पूनम ढिल्लोन या त्या काळातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्रिशूल या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात स्विमिंग सूट घातला होता. तसेच गिरफ्तार या चित्रपटातही त्या स्विमिंग सूट मध्ये दिसल्या. पूनम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपले एक प्रस्थ निर्माण केले. पण गेल्या काही महिन्यांपासून त्या छोट्या पडद्यापासून दूर आहेत. त्या आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळणार आहेत.
दिल ही तो है ही बहुप्रतीक्षित मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येणार आहे. एकता कपूर या कार्यक्रमाची निर्माती असून करण कुंद्रा आणि दस का दममुळे प्रसिद्ध झालेली योगिता बिहानी या कार्यक्रमात मुख्य भूमिका साकारणार आहे. याच मालिकेद्वारे पूनम ढिल्लोन टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 
‘एक नयी पहचान’ या मालिकेतील पूनम यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. या मालिकेनंतर त्या आता प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत त्या नायकाच्या आईची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी आधी गितांजली टिकेकरची निवड करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे या मालिकेत पूनम यांची वर्णी लागली. या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूनम सांगते, “२० वर्षांपूर्वी जेव्हा मी टीव्हीवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा एका चित्रपट कलाकारासाठी हा एक धाडसी निर्णय समजला जात असे. पण टेलिव्हिजन उद्योगाचा भाग होणे हे माझ्यासाठी नेहमीच खूप थरारक आणि परिपूर्णतेचा अनुभव देणारे होते. सोनी आणि माझा संबंध जुना आहे. सोनीवरील ‘एक नयी पहचान’ या मालिकेतील भूमिकेमुळे मला खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आणि आता एकता आणि बालाजीशी या भव्य मालिकेच्या माध्यमातून संलग्न होताना मी खूप उत्साहित आहे. या मालिकेसाठी मी अजून चित्रीकरण सुरू केलेले नाही. पण कामाचा एक चांगला अनुभव मला मिळेल अशी मला आशा आहे. मालिका यशस्वी करण्यासाठी मी सर्व प्रयत्न करीन आणि प्रेक्षकांची मने पुन्हा जिंकून घेईन.”

Also Read : ​दिल ही तो है या मालिकेद्वारे बॉलिवूडमधील हा अभिनेता करणार छोट्या पडद्यावर आगमन