Join us

​ आता बिग बॉस बोलणार मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 12:15 IST

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर आपल्याला अकरा सिझन पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन हिट ठरले आहेत. या ...

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर आपल्याला अकरा सिझन पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजवर अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमितभ बच्चन, फराह खान, सलमान खान आणि संजय दत्त यांनी केले आहे. पण सलमान खान हाच प्रेक्षकांचा लाडका होस्ट आहे. या कार्यक्रमाचा अकरावा सिझन नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे विजेतेपद मराठमोळ्या शिल्पा शिंदेला मिळाले. या कार्यक्रमात शेवटपर्यंत हिना खान आणि शिल्पा शिंदे टिकून राहिले होते. पण या दोघांमध्ये शिल्पाने बाजी मारली. बिग बॉसचे विजेतेपद मिळवणारी शिल्पा शिंदे ही पहिली मराठी स्पर्धक ठरली. बिग बॉस हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना कलर्स या वाहिनीवर पाहायला मिळतोय. हा कार्यक्रम काही दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांप्रमाणेच हा कार्यक्रम प्रेक्षकांना मराठीत देखील पाहायला मिळणार आहे. मराठीत हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचे स्वतः सलमान खाननेच सांगितले आहे. बिग बॉस हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांना कलर्स मराठी या वाहिनीवर पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटी पाहायला मिळणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस ११ चा अंतिम सोहळा काल अनेकजणांनी पाहिला. या कार्यक्रमाचे विजेतेपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. हा कार्यक्रम संपण्याच्या आधी सलमानने एक खूपच चांगली घोषणा केली आहे. तुला बिग बॉस मराठीमध्ये जायला आवडेल का असे शिल्पाला विचारत त्याने बिग बॉस मराठीत सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोणावळ्यामध्येच मराठी बिग बॉसचे घर असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या एक दोन महिन्यांमध्ये बिग बॉस मराठी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. आता या कार्यक्रमात मराठी सेलिब्रेटी कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. Also Read : अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदे बनली ‘बिग बॉस ११‘ची विनर!!