Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पुन्हा होणार डॉ. हाथीची एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:12 IST

कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत डॉ. हाथीची भूमिका कवी कुमार आझाद साकारत होते. पण काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असे. प्रेक्षक त्यांना डॉ. हाथी या नावानेच ओळखू लागले होते. त्यांच्याशिवाय प्रेक्षक या मालिकेचा विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे डॉ. हाथीच्या भूमिकेत कोणत्याही कलाकाराला निर्मात्यांनी घेऊ नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. त्यामुळे डॉ. हाथीच्या भूमिकेसाठी निर्मल सोनीची निवड करण्यात आली आहे.

कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुरुवातीपासून निर्मलच डॉ. हाथी यांची भूमिका साकारत असला तरी प्रेक्षकांना या भूमिकेत कवी कुमार आझाद अधिक भावले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही भूमिका पुन्हा निर्मल सोनी साकारणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा निर्मलची एंट्री लवकरच होणारआहे. याविषयी तो सांगतो, जग गोल है... यावर आता माझा विश्वास बसला आहे. लोकांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हाथीची भूमिका प्रचंड आवडते. ही भूमिका मला पुन्हा साकारण्याची संधी दिल्याबद्दल या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांचा मी आभारी आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकानुसार पाऊस खूप पडत असल्याने गोकुळधाम सोसायटीतील पुरुषांना सोसायटीत गणपती आणणे शक्य झालेले नाहीये. शहरात पाणी खूप भरल्याने पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली आहे आणि त्यामुळे निराश होऊन सगळे सोसायटीत परतले आहेत. पण आता डॉ. हाथी डोक्यावर गणपती घेऊन सोसायटीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हाथी कुटुंबीयच गोकुळधाममधील गणरायाची पहिली आरती करणार आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माकवी कुमार आझादनिर्मल सोनी