Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सावली होईन सुखाची' मालिकेचे नवे पर्व, अमेय बर्वे आणि प्रतिक्षा पोकळे मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:04 IST

Sawali Hoin Sukhachi : 'सावली होईन सुखाची' या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री होते. 

'सन मराठी'वरील 'सावली होईन सुखाची' (Sawali Hoin Sukhachi) या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. या खानावळचं  रूपांतर तिने गौराई मिसळ सेंटरमध्ये केलं आहे. गौराई मिसळ सेंटरचं मोठं हॉटेल करायचं असं तिच्या पार्टनरचं म्हणजेच रुद्रचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री होते. 

नाशिकमधले सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी विजयेंद्र बिराजदार यांचा एकुलता एक मुलगा विराजस नुकताच परदेशातून शिकून आला आहे. अत्यंत श्रीमंत कुटुंबात वाढला असला तरी विराजसला पैशांचा माज नाही. बिझनेसमध्येही त्याला फार रुची नाही. आयुष्य छान जगावं एवढंच त्याचं ध्येय आहे पण आपलं रक्तच आपला बिझनेस पुढे नेणार या वडिलांच्या हट्टापायी विराजसला बिझनेसमध्ये उतरावं लागणार आहे. इकडे पैशांचा माज नसलेला विराजस आणि दुसरीकडे अनाथ पण मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्याची जिद्द असलेली राधा. आता या दोघांची गाठ कशी जुळणार? राधा व विराजस यांची प्रेमकथा सुरु होणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. विराजस बिराजदारच्या भूमिकेत अभिनेता अमेय बर्वे पाहायला मिळणार आहे तर राधा म्हणजेच बिट्टीच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतिक्षा पोकळे पाहायला मिळणार आहे. अमेय व प्रतिक्षाने या दोघांनीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी एकाच मालिकेतही काम केले होत आणि आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.  

विराजसच्या  भूमिकेबद्दल अभिनेता अमेय बर्वे म्हणाला की, "अभिनयाच्या प्रवासात 'सावली होईन सुखाची' मालिकेत पहिल्यांदाच मी मुख्य भूमिका साकारत आहे. विराजस हे पात्र समंजस, साधा,दयाळू, श्रीमंतीचा अजिबात गर्व नसलेला आहे.मी मूळचा नाशिकचा आहे. जेव्हापासून कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हापासून मुंबईला जायची ओढ होती. बऱ्याच मालिकांचे काम मी मुंबईमध्ये केले आहे. पण आता या  मालिकेच शूटिंग नाशिकमध्ये सुरु आहे. त्यामुळे 'सन मराठी' वाहिनीवरील 'सावली होईन सुखाची' या मालिकेत मला मुख्य भूमिकातर मिळालीच पण मी पुन्हा माझ्या घरी परतलो आहे. आता सेटवर दररोज आईच्या हातचा जेवणाचा डब्बा घेऊन जातो. या सगळ्यामुळे आई-बाबा खुश आहेत. सेटवरील वातावरण अगदी सुंदर आहे. मी व प्रतिक्षाने एकत्र काम केलंय त्यामुळे 'सावली होईन सुखाची' मालिकेत काम करणं आणखी सोपं झालं आहे."

या भूमिकेमुळे आई-बाबांचं स्वप्न पूर्ण झालं

राधा म्हणजेच बिट्टीच्या भूमिकेबद्दल अभिनेत्री प्रतिक्षा पोकळे म्हणाली की," खूप वर्षांपासून मुख्य भूमिकेची वाट पाहत होते. 'सन मराठी' वाहिनी व 'सावली होईन सुखाची' मालिकेमुळे मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली. बिट्टी हे पात्र खूप मॅजिकल आहे. अनाथ मुलीचं आयुष्य ती जगली असेल तरीही इतरांना सुखात ठेवायचं. आयुष्यात कितीही दुःख आलं तरीही त्यावर मात करून आनंदाचा मार्ग शोधायचा असे तिचे विचार आहेत. या भूमिकेमुळे मलाही खूप शिकायला मिळत आहे. मी व अमेय पुन्हा एकदा एकत्र काम करतोय त्यामुळे छान वाटत. जेव्हा मला कळलं की, अमेय माझ्याबरोबर काम करणार आहे तेव्हा काम करताना अजून मज्जा येईल ही खात्री मला  मिळाली. या भूमिकेमुळे माझ्या आई बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. प्रोमो पाहिल्यानंतर आनंदाने आईला रात्रभर झोप लागली नव्हती. त्यामुळे आता माझी जबादारी वाढली आहे."