Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 12:47 IST

'सुख कळले' मालिकेच्या प्रेक्षक प्रेमात! सुरू होण्याआधीच स्पृहाच्या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव

टीव्हीवरील अनेक मालिका लोकप्रिय ठरतात. गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिकाही सुरू झाल्या आहेत. तर काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकीच एक म्हणजे 'सुख कळले' ही मालिका. या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी आणि गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी भेटीला येणार आहे. या मालिकेत स्पृहा मुख्य भूमिकेत असून तिच्याबरोबर अभिनेता सागर देशमुखही दिसणार आहे. 'सुख कळले' मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'सुख कळले' या मालिकेतून एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट दाखविण्यात येणार आहे. या मालिकेतून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि जपणाऱ्या एका जोडप्याची कहाणी दाखविण्यात येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये कामावरुन थकून आलेल्या नवऱ्याला त्याची बायको चहा देत काळजीने विचारपूस करताना दिसते. तर 'सुख कळले' मालिकेच्या नव्या प्रोमोत स्पृहाची सागर काळजी घेताना दिसत आहे. या प्रोमोनंतर 'सुख कळले' मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सुरू होण्याआधीच स्पृहाच्या या मालिकेचं कौतुक होताना दिसत आहे. 

'सुख कळले' मालिकेच्या नव्या प्रोमो व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये हा कंटेट चांगला वाटतोय", "मारझोड आणि आक्रमकतेच्या कंटेटमध्ये अशा कंटेटची गरज होती", अशा कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी ही मालिका आवार्जुन पाहणार असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

स्पृहा जोशीची ही नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेत स्पृहा मिथिला तर सागर देशमुख माधव ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'सुख कळले' ही मालिका २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :स्पृहा जोशीसागर देशमुखकलर्स मराठीटिव्ही कलाकार