अभिनयाची उत्तम जाण आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेल्या सर्वांच्या लाडक्या नम्रता संभेरावचा आज वाढदिवस आहे. हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताचा चाहता वर्ग मोठा आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेताही नम्रता संभेरावचा फॅन आहे. नम्रताला पाहून अभिनेत्याने स्वत:ची BMW कार थांबवली होती. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
अफलातून विनोदबुद्धी असलेल्या नम्रताला पाहून अभिनेत्याने चक्क त्याची कार भर रस्त्यात थांबवली होती. हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बोमन इराणी आहेत. बोमन इराणी आणि नम्रताने व्हेंटिलेटर सिनेमात एकत्र काम केलं आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा आहे. एकदा नम्रता सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत रस्त्यावर थांबली होती. तेवढ्यात बोमन इराणी तिथे आले. नम्रताला पाहून बोमन इराणींनी त्यांची BMW कार थांबवत अभिनेत्रीची विचारपूस केली. त्यांनी ड्रायव्हरला सांगून अभिनेत्रीचं सामान गाडीत ठेवायला सांगितलं. आणि नम्रताला पाठीमागे बसायला सांगितलं.
नम्रताने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. नम्रताला काळाचौकीला जायचं होतं. तर बोमन इराणींना मध्येच दादरला उतरायचं होतं. त्यामुळे बोमन इराणींनी माफी मागितल्याचंही नम्रता म्हणाली होती. बोमन इराणींनी नम्रताचं कौतुकही केलं होतं. मी तुझा मोठा चाहता आहे. तुझी ही भाषा कुठेतरी वापरणार असंही ते तिला म्हणाले होते. "त्यांच्या गाडीत बसल्यानंतर मी त्यांना म्हणाले होते की सर मी पहिल्यांदा BMW मध्ये बसले आहे. तर ते म्हणाले की मी पण कधीतरी पहिल्यांदा BMWमध्ये बसलो होतो. एक दिवस तू स्वत:च्या BMW मध्ये बसशील," असं नम्रताने सांगितलं होतं.