'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. दिग्गज अभिनेते मिलिंद गवळी यांच्या सहजसुंदर अभिनयाने हे पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. आता नव्या रुपात आणि नवी गोष्ट घेऊन मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या वचन दिले तू मला या मालिकेतून नामांकित वकील हर्षवर्धन जहागिरदार या पात्राच्या रुपात ते पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत. या संदर्भात नुकतेच मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी 'वचन दिले तू मला' या मालिकेतील फोटो शेअर केला आणि लिहिले की, "'वचन दिले तू मला' स्टार प्रवाह वर १५ डिसेंबर २०२५पासून रात्री साडेनऊ वाजता, सेवेन्थ सेन्स मीडियाची मालिका मायबाप प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. या मालिकेमध्ये मी अॅडव्होकेट हर्षवर्धन जागीरदारची भूमिका करतो आहे. इतक्या वर्षात पोलीस ऑफिसर, डॉक्टर्स, आर्मी ऑफिसर अमर भोसले, रिटायर्ड कर्नल अजय सावंतराव, आमदार मंत्री पण केले, पण कधी सॉलिसीटर किंवा वकील केला नव्हता. कॉलेजचा माझा जिवलग मित्र निर्माता शशांक सोळंकीनी ही संधी दिली आहे, आम्ही दोघेही लाला लजपतराय कॉलेज वरळीमध्ये एका वर्गात आणि एका बाकावर बसायचो, कॉलेजच्या लास्ट इयरला दोघेही भविष्याची खूप मोठी मोठी स्वप्न पाहायचो, दोघांना बंदुकीची आवड, दोघेही रायफल असोसिएशनचे मेंबर्स झालो, दोघेही आपापल्या बंदुका घेऊन वरळी रायफल रेंज मध्ये सराव करायचो, दोघांनाही अभिनय क्षेत्रामध्येच यायचं होतं, आम्ही दोघेही ग्रॅज्युएट झालो, त्याने सीए करायचं ठरवलं, माझं मात्र काही ठरत नव्हतं, मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला फक्त अॅडमिशन घेतलं, पण एम कॉम झालो, सीए आर्टिकल शिप पण केली, पण मग ऑल इंडिया रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन झालो, शशांकने मात्र सीएवर फोकस केला आणि तो सीए झाला. मग निर्माता झाला.''
ते पुढे म्हणाले की, ''काल मालिकेच्या निमित्ताने लॉवर आम्ही दोघेही अनेक तास चर्चा करत बसलो होतो, नियतीने आम्हा दोघांना पुन्हा एकदा कॉलेजसारखं एकत्र अभ्यास करायला बसवलं. एक वेगळं फिलिंग्स, एक वेगळा अनुभव, जो खरं तर शब्दात मांडता येत नाहीये पण तरीही मी व्यक्त करायचा प्रयत्न करतोय. स्टार प्रवाहवरची 'आई कुठे काय करते' मालिकेतल्या अनिरुद्धनंतर 'वचन दिले तू मला'तल्या हर्षवर्धन जागीरदार करताना, शाळेतून पास होऊन ज्या वेळेला कॉलेजला एखादा मुलगा जातो, तेव्हा त्याच्या मनावरचं दडपण, अजून चांगलं करून दाखवायची जिद्द, नवीन वातावरणाची भीती. अशा काहीशा मिश्रित भावना मनात आहेत. या मालिकेमध्ये बाकीचे जे कलाकार आहेत त्यातल्या बऱ्याचशा कलाकारांबरोबर मी पूर्वी काम केली आहेत, पुन्हा त्यांच्याबरोबर काम करायची उत्सुकता तर आहेच, तसेच जे नवीन टॅलेंटेड कलाकार आहेत त्यांच्याबरोबर पण आतुरता आणि कुतूहल आहेच.''
''भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ याप्रमाणे कायद्यांच्या नावांत बदल करण्यात आलेले आहेत. या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर प्रेक्षकांचं कायद्याविषयी, आपल्या हक्कांविषयी माहिती, प्रबोधन सुद्धा होणार अशी माझी खात्री आहे'', असे मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये म्हटलं.
Web Summary : Milind Gawali, famed as Aniruddha, will star in 'Vachan Dile Tu Mala' as advocate Harshvardhan Jahagirdar. He shares his journey and excitement about playing a lawyer role after long time. The series aims to educate audience about laws.
Web Summary : अनिरुद्ध के रूप में प्रसिद्ध मिलिंद गवळी 'वचन दिले तू मला' में हर्षवर्धन जहागीरदार नामक वकील की भूमिका निभाएंगे। उन्होंने लंबे समय बाद वकील की भूमिका निभाने को लेकर अपनी यात्रा और उत्साह साझा किया। श्रृंखला का उद्देश्य दर्शकों को कानूनों के बारे में शिक्षित करना है।