Join us

"तरी तो तुम्हाला पावतोच..." गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांची खास पोस्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:39 IST

अभिनेते मिलिंद गवळी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीचा उत्साह केवळ सामान्य माणसांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे.  'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी गणेशोत्सवाबाबत त्यांच्या भावना व्यक्त करणारी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते पारंपरिक वेशभूषेत गणपतीचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

मिलिंद गवळी पोस्टमध्ये ते म्हणाले, "आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥ हरी पाहिलारे हरी पाहिलारे।संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध अभंग, ज्याचा अर्थ, आहे आजचा दिवस अत्यंत शुभ, आनंददायी आणि दिव्य अनुभूतीने समृध्द आहे. कारण आज मी हरिचं, म्हणजेच विठ्ठलाचं साक्षात्कार अनुभवतो आहे. तसंच आपल्यासाठी सुद्धा आजचा दिवस सोनियाचा आहे, आनंदाचा आहे, परमेश्वराच्या अनुभूतीने भरलेला विशेष दिवस आहे, कारण आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आजच्या दिवशी घरोघरी साक्षात परमेश्वर गणपती बाप्पाच्या रूपाने आपल्याकडे विराजमान झाले आहेत".

ते म्हणाले, "आज पासून जितके दिवस गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. तितके दिवस मनामधली नकारात्मकता, भीती, वाईट विचार, मानसिक अशांती, घरातलं व परिसरातला वास्तूदोष या सगळ्याचा नाश होणार, आणि घरात सुख, शांती, समाधानी वातावरण, आपुलकी आणि प्रेम निर्माण होणार. गणपती बाप्पा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवणार. बाप्पा विघ्नहर्ता, संकटमोचक आणि मंगलकर्ता आहे, ज्यामुळे भक्तांचा आत्मविश्वास वाढतो, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. ताण तणाव आजार नाहीशी होतात".

मिलिंद गवळी म्हणतात, "भाविक बाप्पाच्या श्रद्धेपोटी किंवा भीती पोटी म्हणा, दारू आणि मांसाहार बंद करतात. ही पण एक सकारात्मक गोष्ट या काळामध्ये घडत असते. फक्त दूर्वा, जास्वंदाची फूल, सिंदूर, मोदक, श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप, गणपती अथर्वशीर्ष, आरत्या यांनी बाप्पा प्रसन्न होत असतो. आज पासून राग, रुसवे फुगवे, द्वेष सगळं सोडून एकमेकांच्या भेटी गाठी घ्यायच्या असतात. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी बाप्पा स्वतः विराजमान होतात".

पुढे ते म्हणाले, "परंपरेप्रमाणे काहींकडे गणपती बसवतात तर काहींकडे बसवत नाहीत. काही फारच मनापासून बाप्पाची पूजाअर्चा, सेवा करतात, काहीजण सवयीप्रमाणे करत असतात. गणपती बाप्पाची तुम्ही कशीही आराधना केली तरी तो तुम्हाला पावतोच, वेडी वाकडी पूजा असली तरी सुद्धा ती मनापासून केली तर बाप्पापर्यंत पोहोचतेच.  बाप्पा आपल्या आयुष्याची वाटचाल सोपी, सुखमय, आनंददायी नक्कीच करतो. फक्त श्रद्धा असणं गरजेचं आहे. माझी आई म्हणायची की बाप्पा हा अशिक्षित अडाणी भोळ्या भाबड्या माणसांना लगेचच पावतो. कारण त्यांच्याकडे निस्सिम विश्वास आणि श्रद्धा असते. आणि जी अति हुशार अति शहाणी, बनावट बुद्धिजीवी असतात त्यांना पण बाप्पा पावतो, पण जरा उशिराच. चला तर मग गणेश उत्सवाच्या मंगलमय वातावरणामध्ये रमून जाऊया, एकमेकांना भेटूया, शुभेच्छा आशीर्वाद देऊया, एकमेकांकडे जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया" सं म्हणत त्यांनी श्रद्धा आणि विश्वासाचं महत्त्व अधोरेखित केलं.

टॅग्स :मिलिंद गवळीगणेश चतुर्थीगणेशोत्सव 2025सेलिब्रिटी गणेश