Join us  

'वजनावरुन टोमणे मारलेच पण अपशब्दही वापरले'; दिव्या पूगांवकरचा किरण मानेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:51 PM

Kiran mane controversy: मालिकेत माऊची म्हणजेच साजिरी पाटीलची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पूगांवकरने किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना तडकाफडकी काढल्यामुळे कलाविश्वासह राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. यात अनेक सेलिब्रिटींनी किरण माने यांना पाठिंबा दिला आहे. तर, मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी मात्र, त्यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळामध्येच मुलगी झाली हो मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिव्या पूगांवरकर हिने किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत.

अलिकडेच स्टार प्रवाह या वाहिनीने किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता का दाखवला याविषयी त्यांची भूमिका मांडली आहे. तसंच मालिकेतील कलाकारांनीही सेटवर किरण माने यांचं वागणं कसं होतं. त्यांनी अन्य कलाकारांसोबत कसं वर्तन केलं हे सांगितलं आहे. यामध्येच मालिकेत माऊची म्हणजेच साजिरी पाटीलची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पूगांवकरने किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. किरण माने कायम मला वजनावरुन ट्रोल करत होते असं ती म्हणाली आहे.

"किरण माने आणि माझं बोलणं व्हायचंच नाही. सुरुवातीला जेव्हा मी या मालिकेच्या सेटवर आले त्यावेळी किरण माने मला भेटले. आणि, या मालिकेत मी तुझ्या वडिलांची भूमिका करतोय. तर, आपण सेटवरही तसंच राहुयात. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते असं ते म्हणाले. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. पण नंतर ते मला सतत वेगवेगळ्या गोष्टींवरुन टोमणे मारायला लागले", असं दिव्या म्हणाली.

पुढे ती म्हणते,  अनेकदा त्यांनी माझ्या वजनावरुन टोमणे मारले. इतकंच नाही तर अपशब्ददेखील उच्चारले. त्यामुळे आता त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून हवे. मालिकेचं चित्रीकरण थांबणार नाही. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेकदा समजही देण्यात आली होती.

दरम्यान, सध्या संपूर्ण राज्यभरात किरण माने यांचं प्रकरण गाजत आहे. अलिकडेच किरण माने यांनी राजकीय भूमिका घेत सोशल मीडियावर त्यांचं मत मांडलं होतं. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली. विशेष म्हणजे राजकीय भूमिका घेतल्यामुळेच मालिकेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असा आरोप त्यांनी मालिकेच्या मेकर्सवर केला आहे. या प्रकरणानंतर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळींना त्यांना पाठिंबा दिला आहे. तर, काही जणांनी त्यांच्यावर टीकेचीही झोड उठवली आहे.  

टॅग्स :किरण मानेटिव्ही कलाकारटेलिव्हिजन