छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे मन झालं बाजिंद. गावच्या मातीत खुलत जाणारी राया आणि कृष्णाची लव्हस्टोरी या मालिकेत उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. आतापर्यंत या मालिकेत प्रत्येक सण, उत्सव मोठ्या थाटात साजरा झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता मालिकेत पहिल्यांदाच बगाड यात्रेचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.
बगाड यात्रा ही सातारा, वाई या भागातील विशेष प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी राज्यातील अनेक ठिकाणाहून भाविक येतात. त्यामुळेच ही बगाड यात्रा यावेळी मालिकेत दाखवली जाणार आहे. वाई येथील फुलेनगर -शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड या मालिकेच्या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.
ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच मालिकेत कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी राया तिला घटस्फोट द्यायलाही तयार होतो. त्याच दरम्यान गावची बगाड यात्रा जवळ आली आहे. रायाला समजते आणि तो ठरवतो की देवीला नवस करायचा आणि बगाड घ्यायचे. पण ज्या लोकांचा नवस पूर्ण होतो त्यांनाच बगाडाचा मान मिळत असतो. या मुद्द्यावर गावकरी त्याला विरोध करतात पण या विरोधाला न जुमानता तो कौल लावतो आणि यंदाचा बगाड्याचा मान रायभान विधाते याला मिळतो.
दरम्यान, कृष्णाची जन्मपत्रिका रायला सापडते तो ती गुरुजींना दाखवतो आणि गुरुजी सांगतात की येत्या ७ दिवसात तिचा मृत्यूयोग आहे त्यावर राया त्यांना सांगतो मी माझ्या कृष्णाचा मृत्यू टाळेन आणि तो बगाड्या म्हणून उभा राहतो. रायाची भक्ती वाचवू शकते का कृष्णाचे प्राण? हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे .