Madhuri Pawar: अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'देवमाणूस', 'रानबाजार' या मराठी वेब सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने आणि नृत्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील येड लागलं प्रेमाचं मालिकेत निक्की नावाचं पात्र साकारताना दिसते. दरम्यान, माधुरी पवार सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिच्या फोटो, व्हिडीओंमुळे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या एका चाहतीचा भावनिक किस्सा शेअर केला आहे.
माधुरी पवारने याआधी सुद्धा तिच्या एका चाहतीचा व्हिडीओ कॉलवर संवाद साधताना सुंदर प्रसंग शेअर केला होता. त्यानंतर आता अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत एका वयोवृद्ध आजींच्या भेटीचा भावुक करणारा किस्सा सांगितला आहे. या पोस्टला भलंमोठं कॅप्शन देत अभिनेत्रीने त्यामध्ये लिहिलंय की, "सहज जाता जाता एक गृहस्थ भेटले. त्यांची आई माझी खूप मोठी फॅन होती. त्यांच्या चेहऱ्यावरच ममत्व आणि आदर स्पष्ट दिसत होता. वय झाल्यामुळे त्यांच्या आईंना जास्त चालता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी अगदी आग्रहाने विचारलं तुम्ही आमच्या घरी याल का? आईला भेटा, तिचं खूप मोठं स्वप्न आहे तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचं."
पुढे माधुरीने अनुभव सांगत लिहिलंय, "त्या क्षणी मनात आलं आपण किती जणांच्या हृदयात स्थान मिळवलंय, आणि ते फक्त कामातूनच नव्हे, तर आपल्या अस्तित्वातून, आपल्या संवादातून. त्यांच्या विनंतीला मान देत मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या आईला भेटले. डोळ्यात आनंदाश्रू, चेहऱ्यावर समाधान हे क्षण काही शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. हा अनुभव आयुष्यभर आठवणीत राहील… मनापासून आभार त्या मातेचे आणि त्या गृहस्थांचे तुमचं प्रेमच माझी खरी ताकद आहे." असा भावनिक किस्सा अभिनेत्रीने या पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
माधुरी पवारने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय अभिनेत्रीच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.