Disha Pardeshi: जगभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. सर्वत्र उत्साह, आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षासाठी स्वागतासाठी सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान, मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परदेशीने (Disha Pardeshi ) इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दिशाने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घेतलं आहे. त्यासोबतच तिने भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे सुद्धा दर्शन घेतलं.
नुकतीच दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर २०२५ मधील पहिली पोस्ट शेअर केली आहे. "कृतज्ञता आणि आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरूवात..." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलंय. नववर्षामध्ये अभिनेत्री स्वामींच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय.
दिशा परदेशी ही मराठी मालिकाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' या मालिकेमुळे दिशा प्रसिद्धीझोतात आली. सध्या दिशा झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेली तुळजा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.