Amit Bhanushali: छोट्या पडद्यावरील मालिका 'ठरलं तर मग' ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. अभिनेता अमित भानुशाली आणि जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असते. या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली साकारत असलेला अर्जुन हे पात्र रसिकांना भावलं आहे. परंतु, अमितला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
नुकतीच अमित भानुशालीने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेत्याला तुला इंडस्ट्रीत येण्याआधी स्वत मध्ये काही बदल करावे लागले का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना तो म्हणाला," खूपच बदल करावे लागले. २००० साली जेव्हा कहों ना प्यार है हा सिनेमा आला त्यानंतर मी हृतिक रोशनचा डायहार्ट फॅन झालो आणि आजही आहे. मला तेव्हा हृतिकची स्टोरी माहीत नव्हती. मग विकीपीडियावरती मी त्याची लाईफस्टोरी पाहिली. आम्हा दोघांमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे की मी देखील त्याच्याप्रमाणे अडखळत बोलायचो. "
पुढे अमितने सांगितलं, "मी दुसरीत असताना त्यावेळी आमच्या घरात स्टोव्ह वापरला जायचा. केरोसीन टाकून त्या स्टोव्हवर जेवण बनवलं जायचं. त्या स्टोव्हला आग लागली होती. आईने हॉलमधून तो स्टोव्ह बाहेर टाकल्याने त्यामधून सगळं केरोसीन बाहेर आलं आणि आगीचा भडका उडला. त्यावेळी आई मला म्हणाली, 'तू बाहेर जा आणि लोकांना बोलवून आण'. त्याचक्षणी मी घराबाहेर जात असताना ती आग माझ्या चेहऱ्यावर आली आणि मी खूपच घाबरलो. त्या घटनेनंतर मला ताप आला आणि माझी वाचा गेली. त्यानंतर मी बोलायला लागलो तर खूप अडकायचो. कॉलेजपर्यंत मी असंच आयुष्य काढलं. कोणीतरी टपली मारायचं आणि मग मी बोलायचो, असं सगळं होतं."
१२-१२ तास मी स्टेजवर उभा राहून सराव करायचो...
"मग मी हृतिकची एक मुलाखत वाचली आणि त्याने या सगळ्यावर कशी मात केली हे समजलं. या सगळ्यात थिएटरने मला खूप मदत केली. शिवाय माझ्या आई-वडिलांचाही मोठा हात आहे. मी कोणत्या शब्दावर अडकतो त्याचं निरक्षण करुन ते मला रोज सकाळी उठवून त्या शब्दांचा सराव करायला लावायचे. १२-१२ तास मी स्टेजवर उभा राहून एक शब्द बोलायचो. कारण, कुठे अडखळायला नको. या प्रवासात माझ्या गुरुंनी खूप साथ दिली." असा खुलासा अमितने या मुलाखतीत केला.