Join us

प्राजक्ताचा अपघात अन् शंभुराजची पहिली धडक, 'मॅडम' म्हणत सुरू झाली फिल्मी लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:26 IST

एक अपघात अन् प्राजक्ता आणि शंभुराजची पहिली धडक, मॅडम म्हणत म्हणत सुरू झाली फिल्मी लव्हस्टोरी

 Prajakta Gaikwad : 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) . नुकताच प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात शंभुराजची एन्ट्री झाली. प्राजक्ता गायकवाड आणि उद्योजक शंभूराज खुटवड यांचा ७ ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला. मात्र, हे दोघे नेमके कुठे भेटले हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. याबद्दल प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज यांनी खुलासा केला आहे. 

अलिकडेच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता गायकवाड आणि तिचा होणारा नवरा शंभुराज खुटवडने संवाद साधला. दरम्यान, प्राजक्ताने तिच्या फिल्मी लव्हस्टोरीविषयी सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मला तर वयाच्या १८व्या वर्षानंतर वेगवेगळी स्थळ यायला सुरुवात झाली होती. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे मी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले होते. वेगळवेगळ्या क्षेत्रातील स्थळं यायला सुरुवात झाली होती. पण मला डिग्री पूर्ण करायची होती आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या असं मी ठरवलं होतं."

अशी झाली प्राजक्ता अन् शंभुराज यांची भेट!

पुढे प्राजक्ता म्हणाली, "आमची भेट तर खूप खास होती. मी एका चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि त्याची नाईट शिफ्ट होती. तेव्हा माझ्या नवीन घराचं बांधकाम झालं होतं. नवीन घरात देवालाही नवीन घर घेऊया त्यासाठी आम्ही जात होतो. तेव्हा अचानक एक ट्रक आला आणि आमच्या गाडीला धडकला. तर तेव्हा मी खूप हायपर झाले होते. आम्ही सगळे त्या ड्रायव्हरवर चिडलो, मग तुमचा जो कोणी ओनर आहे त्याला बोलवा असं त्याला सांगितलं. हे खूपच फिल्मी आहे. त्यानंतर हे तिथे आले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला दोन ठेवून दिल्या. तो ड्रायव्हर खूप विचित्र बोलत होता. पण, मला वेगळंच प्रेशर होतं की, आता गाडीचं नुकसान झालंय आणि मला नाईट शिफ्टला जायचं आहे. पण, ते तिथे आले आणि त्यांनी सगळं छान सांभाळून घेतलं. ते मला म्हणाले की मी तुम्हाला सोडायला येतो सेटवर. त्यानंतर आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो.मला माझ्या भूमिकेमुळे सगळे ताई बोलायचे. पण, शंभुराज यांनी मला कधीच ताई म्हणून हाक मारली नाही. ते मुद्दाम मला मॅडम म्हणायचे. पण मी त्यांना दादा अशीच हाक मारायचे." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.

दरम्यान, प्राजक्ता आणि शंभुराज यांची पहिली भेट एका अपघातादरम्यान झाली होती, जिथे शंभूराज यांनी प्राजक्ताला मदत केली. हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं . त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुरुवातीला प्राजक्ताने नकार दिला, पण शंभूराज यांनी तिच्या क्षेत्राची ओळख करून घेत विश्वास जिंकला. घरच्यांच्या संमतीनंतर दोघांचा साखरपुडा ठरला. 

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रिटी