Priya Marathe Death: 'तू तिथे मी' ते तुझेच मी गीत गात आहे' या मराठी मालिकांमध्ये दिसलेली तसंच 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली गुणी अभिनेत्री प्रिया मराठीचे (Priya Marathe) हिचं निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून ती कर्करोगाने त्रस्त होती. आज सकाळी चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया केवळ ३८ वर्षांची होती. तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी चार वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशान भूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
प्रिया मराठे आणि तिचे पती शंतनु मोघे हे दोघे मीरारोड येथील घरी राहत होते. प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र गेल्या दोन तीन महिन्यांपासून तिच्या शरिराने उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. अखेर आज रविवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. प्रियाची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. तिच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय अचानक आलेल्या या बातमीनंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
प्रिया शेवटची स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसली होती. अभिजीत खांडकेकर मालिकेत मुख्य भूमिकेत होता. तर प्रिया यामध्ये मोनिका कामत ही भूमिका साकारत होती. काही महिन्यांपूर्वी प्रियाने मालिका सोडल. गेल्या वर्षी आलेल्या सुबोध भावेच्या 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतही प्रिया खलनायिकेच्या भूमिकेत होती. पडद्यावर खलनायिकेच्या भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध होती. याशिवाय तिने 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतही काम केलं होतं. 'साथ निभाना साथिया','बडे अच्छे लगते है' या हिंदी मालिकांमध्येही ती दिसली होती.
प्रिया मराठेने 'या सुखांनो या' मालिकेतून पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'चार दिवस सासूचे' मध्ये दिसली. 'तू तिथे मी','येऊ कशी तशी मी नांदायला','स्वराज्य जननूी जिजामाता','स्वराज्यरक्षक संभाजी' या अनेक मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या. प्रियाने 'द परेफक्ट मर्डर','तिला काही सांगायचंय' या मराठी नाटकांमध्येही काम केलं. २४ एप्रिल २०१२ रोजी प्रियाने अभिनेता शंतनु मोघेशी लग्नगाठ बांधली होती.