'स्टार प्रवाह'वरील लोकप्रिय 'ठरलं तर मग' मालिकेत अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) लवकरच कमबॅक करणार आहे. ती मालिकेत परत येत आहे. तिने आपल्या युट्यूब व्लॉगमधून स्वत:च ही माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला. नुकतंच तिने लेकीचं बारसं केलं. घरात छोटेखानीच हा कार्यक्रम झाला. मात्र बाळाचा पहिला वाढदिवस खूप जोरात करणार असल्याचं ती म्हणाली. दरम्यान बारसं इतकं छोट्या प्रमाणात का केलं याचं कारणही तिने सांगितलं आहे.
अभिनेत्री मोनिका दबडेने लेकीचं नाव 'वृंदा' असं ठेवलं आहे. युट्यूब व्लॉगमधून तिने बारश्याची झलक दाखवली. यावेळी ती म्हणाली, "मी बाळाचा चेहरा इतक्यात दाखवणार नाही. म्हणजे माझं बाळ काही तैमुर वगरे नाहीए की मी चेहरा दाखवू शकत नाही. पण इतक्यात लोकांना चेहरा दाखवायला नको असं माझं आणि माझ्या नवऱ्याचं ठरलं आहे."
ती पुढे म्हणाली,"आम्ही खूप घरातल्या घरात पटकन बारसं करायचं ठरवलं. याचं पहिलं कारण बाळाची आत्या येणार होती आणि दुसरं म्हणजे मी लवकरच काम सुरु करणार आहे. मी मालिकेत परत येत आहे. मग त्यासाठी वेळ मिळेल की नाही म्हणून आम्ही घरच्या घरी पटकन बारसं केलं. खूप मोठं बारसं केलेलं नाही. अनेक जण मोठं, छान बारसं करतात मलाही तसं करायचं होतं. पण मी बाळाचा पहिला वाढदिवस मी खूप मोठा करणार असं मी स्वत:ला प्रॉमिस केलेलं आहे. तेव्हा मी वेळ काढणार आहे."
मोनिका दबडे लग्नानंतर १० वर्षांनी आई झाली आहे. १५ मार्चला मोनिकाने मुलीला जन्म दिला. प्रेग्नंसीमुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच ती मालिकेतून गायब झाली होती. आता ती पुन्ह मालिकेत येत आहे. मोनिका मालिकेत 'अस्मिता सुभेदार'च्या भूमिकेत आहे जी अर्जुनची बहीण आहे. अस्मिताच्या मालिकेत येण्याने सायली-अर्जुनचं नातं काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.