Anushka Sarkate: 'लक्ष्मीनारायण', 'कारभारी लय भारी' तसेच '३६ गुणी जोडी' या मालिकांमधून अभिनेत्री अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) घराघरात पोहोचली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनोवर अधिराज्य गाजवलं. अनुष्का मालिकांसह वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सक्रिय असते. दरम्यान, मराठी कलाविश्व गाजवल्यानंतर अभिनेत्रीला नुकत्याच एका जाहिरातीमध्ये थेट सलमान खानसोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना माहिती दिली आहे.
अभिनेत्री अनुष्का सरकटेने सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत एका जाहिरातीसाठी शूटिंग करतानाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. "माझ्या अस्तित्वाचा, माझ्या भावनांचा, माझ्या संयमाचा आणि माझ्या स्वप्नांचा एक भाग असलेल्या या कामातून थोडा वेळ काढून तुमच्यासोबत काही खास क्षण शेअर करू इच्छिते."
पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "'हम आपके हैं कौन' मधील 'प्रेम' फक्त माझा आहे म्हणून माझ्या बहिणींशी झालेल्या भांडणापासून ते प्रत्यक्षात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यापर्यंतचा अनुभव म्हणजे आयुष्याने मला बक्षीस दिलं आहे." असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय सलमानसोबत जाहिरातीमध्ये काम करतानाचे काही अनसीन फोटो देखील शेअर केले आहेत.
अनुष्काने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींनी लाईक्स आणि कमेंट्स करत अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.