'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनघा भगरे. अनघाला आपण विविध माध्यमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अनघाचे बाबा अतुल भगरे हे सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत. झी मराठीवरील वेध भविष्याचा कार्यक्रमातून त्यांनी राषी आणि भविष्य यांविषयी कार्यक्रम घेतले आहेत. अशातच अनघाने (anagha bhagare) भारत पाकिस्तानावर हल्ला करेल, ही भविष्यवाणी बाबांनी आधीच केली होती, अशी पोस्ट केली आहे. काय म्हणाली अनघा? जाणून घ्या
बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती
झालं असं की, अनघाचे बाबा अतुल भगरेंनी पंढरपूरमध्ये २ मे रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी "भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असून ग्रहमान भारताच्या बाजूने आहे. पुढील ३६ तास महत्वाचे आहेत", असं वक्तव्य केलं होतं. परंतु त्यामुळे अतुल भगरेंना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. पण आता 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अनघाने वडिलांनी केलेल्या वक्तव्याची पुन्हा सर्वांना आठवण दिली असून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
अनघाने इन्स्टाग्राम स्टोरीवर सांगितलं की, "दोन दिवसांपूर्वीच बाबांनी यावर भाकीत केलं होतं. परंतु त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी केलेलं भाकीत खरं ठरलं" अशाप्रकारे अनघाने बाबांना समर्थन देऊन सर्व ट्रोलर्सची तोंडं बंद केली. अनघाने या पोस्टसोबत 'ऑपरेशन सिंदूर'चा फोटोही शेअर केला. अनघाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या प्रशांत दामलेंसोबत 'शिकायला गेलो एक' नाटकात अभिनय करत आहे.