Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिला घटस्फोट अन् 'तिच्या' येण्यानं आयुष्य सावरलं! सुनील तावडेंनी पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी, ११ वर्षांनी लहान आहे पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:31 IST

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सुनील तावडे हे मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील भाष्य केलं आहे. 

Marathi Actor Sunil Tawde: मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सुनील तावडे हे मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव आहे. आपल्या आजवरच्या वाटचालीत त्यांनी असंख्य नाटक,मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केलं आहे. त्यांचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. सध्या सुनील तावडे हे एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत.या मुलाखतीत त्यांनी आपला अभिनय प्रवास तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील भाष्य केलं आहे. 

सुनील तावडे यांनी १९८७ साली सोनाली तावडे यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या सुखी संसाराला ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतीच आरपार ला दिलेल्या मुलाखतीत सुनील यांनी त्यांच्या भन्नाट लव्हस्टोरीबद्दल खुलासा केला आहे. घटस्फोटाची केस कोर्टात सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात सोनाली आल्या. सुरुवात झाली ती अगदी साध्या भेटीतून, एकांकिकेच्या ऑडिशनच्या निमित्ताने. त्या भेटीत त्यांनी आधी त्यांच्या कुटुंबाशी मैत्री केली.त्यानंतर सोनाली यांच्या वडिलांचा विनोदबुद्धीने भरलेला स्वभाव त्यांना खूप भावला. आणि हळूहळू सोनाली आणि त्यांच्यातील ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं.

आपल्या प्रेमकहाणीबद्दल बोलताना सुनील तावडे म्हणाले,सोनालीला भेटण्याआधी माझा घटस्फोट झालेला. जेव्हा घटस्फोट घ्यायचं निश्चित झालं, त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास चार वर्षांचा कालावधी लागला. तेव्हा काय करायचं हे मलाही कळत नव्हतं. कारण, घटस्फोट मिळत नव्हता आणि आयुष्य असंच पुढे सुरू होतं.शेवटी मी कंटाळलेलो, कारण घटस्फोट मिळाला तर ठीक नाहीतर आपण असंच राहू असं मी ठरवेलं. त्यादरम्यान एक एकांकिका सुरू होती. तिथे ऑडिशनसाठी एक मुलगी तिच्या फॅमिलीसोबत आलेली. आता तेव्हाच्या काळात जरा व्यवस्थित काम करता आलं की, लगेच सिलेक्ट करायचे. ती मुलगी एकांकिका करण्यासाठी ‘ओके’ म्हणाली. म्हटलं चला आता कॉफी प्यायला जाऊयात. कॉफी प्यायला गेल्यावर मी नेहमीप्रमाणे तिची चौकशी करायला लागलो.तिचे वडील हे स्वभावाने विनोदी आहेत. तेव्हा तिच्या वडिलांशी आणि तिच्या भावाशी मी खूप गप्पा मारल्या. तिचे वडील इतके विनोदी होते, मला खरंच त्यांच्याशी गप्पा मारून खूपच भारी वाटलं होतं. ते सुद्धा एक कलाकार होते.त्यांची पण संस्था होती. शिवाय आपसाआपसांत ओळख देखील निघाली.

त्यानंतर मी घरी जाऊन सांगितलं होतं की, आज मी आयुष्यात खूप छान लोकांना भेटलोय. तर, सांगायचा मुद्दा असा की, तिचे वडील मला आधी आवडले, त्यानंतर मग मुलगी आवडली. हळुहळू तिलाही समजलं हा आपल्या प्रेमात आहे. मग, मी तिला सगळ्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या. आताची मुलं जशी सगळं थेट जाऊन आई-बाबांना सांगतात, आधी असं नव्हतं. तिच्या घरच्यांसमोर माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे यासाठी मी त्यांची कामं केली. त्यावेळीच दुसऱ्या बाजूला माझी घटस्फोटाची केस सुद्धा सुरू होती. तेव्हा मग मी जे काही खरंय ते तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. तिलाही हे सगळं समजल्यावर थोडा धक्का बसला होता. त्यानंतर तिने याबद्दल घरच्यांना सांगितलं. आश्चर्य म्हणजे, तिच्या घरचे म्हणाले, ‘ठीक आहे, काहीच हरकत नाही’ जर तुझ्या बाबतीत असं घडलं असतं तर? त्यांचं घर खरंच खूप छान होतं. 

"त्यांच्या घरात १४ लोक राहत होते, एकत्र कुटुंबात ती लहानाची मोठी झाली होती. म्हणूनच मी सुद्धा सोनालीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण, ती पुढे जाऊन माझ्याही कुटुंबात अशाचप्रकारे मिळून मिसळून राहील. खरंतर, माझ्यापेक्षा ती वयाने खूप लहान होती. आमच्या दोघांमध्ये ११ वर्षांचं अंतर आहे. सोनाली २१ वर्षांची असताना आमच्या मुलीचा जन्म झाला. तिच्या मी प्रेमात पडण्याचं कारण म्हणजे तिचा स्वभाव होता.  माणसाला एकदा ठेच लागली की, माणूस जास्त शहाणा होतो. माझ्या आत्यानं सुद्धा लग्नाच्या बाबतीत नीट विचार करून निर्णय घे असं मला सांगितलं होतं. मग, त्यानंतर मी लग्न करताना भरपूर विचार करून निर्णय घेतला होता. असा खुलासा सुनील तावडे यांनी मुलाखतीत केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Tawde reveals love story after divorce, wife is younger.

Web Summary : Actor Sunil Tawde shared his love story with Sonali after his divorce. He was drawn to her family's warmth and humor, eventually marrying her despite an 11-year age gap.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी