Prasad Khandekar: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या विनोदी कार्यक्रमाचे जगभर चाहते आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्राने अनेक नवोदित कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारावर चाहते भरभरून प्रेम करतात. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रसाद खांडेकर. चित्रपटांसह प्रसादचा रंगभूमीवरही दांडगा वावर आहे. त्याच्या करिअरची सुरुवात नाटकाद्वारे झाली. मात्र, एकदा नाटकादरम्यान अभिनेत्याचा अपघात झाला होता. त्यावेळी नेमकं काय घडलेलं याबद्दल एका मुलाखतीत त्याने सांगितलं आहे.
एक उत्तम लेखक लेखक,दिग्दर्शक,निर्माता आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा प्रसाद खांडेकर चित्रपटांद्वारे नवीन विषय प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहे. नुकतीच प्रसाद खांडेकरने या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये प्रसाद खांडेकरने त्याच्या अपघातांबद्दल सांगितलं. तेव्हा तो म्हणाला," आयु्ष्यात असा एक प्रसंग आलेला जेव्हा वाटलं आता सगळं संपलं.'चेहरा फेरी' नावाचं नाटक होतं संतोष काणेकर-अथर्व निर्मित आणि प्रियदर्शन जाधव लिखित-दिग्दर्शित. त्याआधी माझी दोन व्यावसायिक नाटकं आलेली, 'आम्ही पाचपुते' आणि 'जळूबाई हळू' विजय चव्हाण यांच्याबरोबर केलेलं नाटक. ज्या माणसाला लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्या विजू मामांसोबत काम करायला मिळालं. त्यानंतर हे 'चेहरा फेरी' नावाचं नाटक होतं,त्या नाटकात रसिका वेंगुर्लेकर होती. खूप उत्तम आणि मोठा रोल होता. १५ ऑगस्टला ओपनिंग होतं आणि १४ ऑगस्टला चालू जीआरमध्ये माझा अपघात झाला. टेबलावरून माझा पाय सटकला आणि माझं लिगामेंट टीअर झालं. "
संपूर्ण प्रयोग सोफ्यावर बसून केला…
मग पुढे अभिनेता म्हणाला,"त्यानंतर निर्मात्यांनी मला लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, त्याच्या लिगामेंट टीअर झाल्यात, तो चालू शकत नाही. सगळे असे होते की, उद्या शुभारंभाचा प्रयोग आहे. मी प्रियदर्शनला म्हटलं, तू मला परवानगी दे, मुव्हमेंट चेंज करायची, मी नाटकाचा प्रयोग करेन. त्यावेळी मी संपूर्ण प्रयोग तो सोफ्यावर बसून केला आणि ज्यावेळी चालायचो तेव्हा पकडून, लंगडत चालत तो प्रयोग केला. प्रयोगानंतर प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. त्या परिस्थितीत जवळपास ३०-४० प्रयोग केले. पण, त्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुला ऑपरेशन करावं लागेल, मी ऑपरेशन केलं."
मला वाटलं स्ट्रगल संपला, पण...
दुसऱ्या अपघाताबद्दल बोलताना प्रसादने सांगितलं,"मी ऑपरेशन केलं आणि त्यानंतर पुन्हा जॉईन झालो. ती भूमिका खरंच कमालीची होती. त्या एका नाटकाच्या जोरावर मी एक मालिका, एक शो, सतीश राजवाडेंचा एक सिनेमा आणि हे नाटक करत होतो. मला वाटलं स्ट्रगल संपला. हे असताना वाशीला प्रयोगाला बाईकने जात होतो, आणि एक पाय नुकताच बरा होत होता. प्रयोगाला जाताना पुन्हा माझा अपघात झाला. त्यावेळी माझ्या दुसऱ्या पायाला दुखापत झाली. मग डॉक्टर म्हणाले, ह्या पायाचंसुद्धा ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास गेला. मी आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो नोकरीसाठी. पण, मी देवाचे आभार मानतो त्या इंटरव्ह्यूला मी रिजेक्ट झालो नाहीतर मी इथे येऊ शकलो नसतो." असा अपघाताचा प्रसंग अभिनेत्याने मुलाखतीत शेअर केला.