Join us
Daily Top 2Weekly Top 5

“… आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल,” सचिन खेडेकरांच्या व्हिडीओची तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:33 IST

सचिन खेडेकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात त्यांनी केलेलं आवाहन मराठी माणसाच्या मनाला भिडणारं आहे. पाहा व्हिडीओ.

सध्या कोण होणार करोडपती हा सोनी मराठी वरील कार्यक्रम सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. कौन बनेगा करोडपती नंतर मराठी मध्ये आलेल्या या कार्यक्रमानं प्रेक्षकांना भुरळ घातली. सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालनही सर्वांच्या पसंतीस पडत आहे. मनोरंजनासोबतच ज्ञानात भर घालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाहिला जातोय

सध्या या कार्यक्रमातील सचिन खेडेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सचिन खेडेकर मराठी भाषेसंदर्भात आणि मराठी माणसांना नोकरी मिळवण्यासाठी एक आवाहन करताना दिसतायत. हा व्हिडीओ ४७ सेकंदांचा असून त्यात सचिन खेडेकर एक आवाहन करताना दिसतायत. त्यांनी यात केलेलं आवाहन नक्कीच मराठी माणसाच्या मनाला भिडणारं आहे.काय म्हणतायत यात सचिन खेडेकर?“तुम्हाला जेव्हा कॉल सेंटरला फोन लावायचा असतो तेव्हा इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता, तिथेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. त्यावेळीही तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटींगवाल्यांचा फोन येतो आणि तुम्ही तो घेता, समोरचा तुमच्याशी हिंदी किंवा इंग्रजीतून बोलायला लागतो. त्यावेळी तुम्ही मराठी बोलायचा आग्रह धरा. खरंतर सहसा असं होत नाही, पण व्हायला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही तर हा हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मराठीचा आग्रह धरुया. कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल, व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकू या, मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल!,” असे ते या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

टॅग्स :सचिन खेडेकरमराठीसोशल मीडिया