Join us  

'बॅकस्टेजला फोटोसाठी रांगेत उभा असलेला मी...';अधिपतीने सांगितला अशोक मामांसोबतचा हळवा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:50 PM

Hrishikesh Shelar: हृषिकेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून अशोक सराफ यांच्याविषयीचा किस्सा शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्या मालिकांमध्ये एक मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही मालिका म्हणजे 'तुला शिकवीन चांगलाच धडा'. अभिनेता हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या कलाविश्वात चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे मालिकेतील अधिपती म्हणजे हृषिकेश यांचा रांगडा अंदाज प्रेक्षकांना भावत आहे. हृषिकेश सध्या सोशल मीडियावर त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच हृषिकेशने अभिनेता अशोक सराफ यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हृषिकेश सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो.मात्र, यावेळी त्याने अशोक सराफ यांच्याविषयी एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काय आहे हृषिकेशची पोस्ट?

दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाचं नाटक आलेलं असतं. आपण आपल्या जिगरी दोस्ताबरोबर आपल्या 'त्या' आवडत्या नटाचे डायलॉग्ज म्हणत म्हणतच दीड-दोन तासाची रपेट करून नाटकाला पोहचतो. पडदा उघडतो आणि 'ते' स्टेज वर येतात, आपण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो.. आणि पाहतच राहतो. हाच तो नट ज्यांनं आपलं बालपण सुंदर केलं,आनंदी केलं.. हाच तो नट जो आपल्याला एवढा आपलासा वाटतो, जवळचा वाटतो, की तो आपल्या स्वप्नात येतो. आपण बुचकळ्यात.. हे सत्य आहे की

तेच स्वप्न कंटिन्यू होतय?

नाटक संपल्यावर बॅक स्टेजला मोठी रांग त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. आपणही त्या गर्दीत सामील होतो, अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुप्परस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटतं आणि आपण फोटो न काढताच बाजूला होतो रांगेतून आणि दोस्ताला कानात म्हणतो "मला 'गर्दी' म्हणून नाही भेटायचं यांना. मी भेटणार नक्की, पण आत्ता असं नाही". बॅक स्टेजला घुटमळत आमच्या भेटीचा तो क्षण आपण लांबणीवर टाकून देतो, अनिश्चित काळासाठी. आपण परत बुचकळ्यात.. हा शहाणपणा की मूर्खपणा?कट टू..

बरोब्बर दहा वर्षांनी, आता स्टेजवर आपल्या 'त्या' सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो, ते आपल्या कामाचं कौतुक करत असतात आणि त्यांचे शब्द स्लोमोमध्ये आपल्या कानावर हळुवार मोरपिसासारखे..! अगदी तसंच जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय. आपला आपल्या कानांवर-डोळ्यांवर विश्वास बसत नाही आपण थेट त्यांचे पाय धरतो, स्लोमो मध्येच. बॅकस्टेच्या रांगेतला मी, स्टेजवरच्या माझ्याकडे पाहून हसतो; आणि आपण परत एकदा कंटिन्युटीमध्ये बुचकळ्यात..हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतय?

दरम्यान, या पोस्टमध्ये हृषिकेशने अशोक सराफ यांच्या भेटीचा किस्सा शेअर करत कलाविश्वात त्याची प्रगती कशी झाले हे सुद्धा एक प्रकारे सांगितलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनअशोक सराफसेलिब्रिटीटिव्ही कलाकार