बिग बॉस मराठी फेम आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता अक्षय केळकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. अक्षय त्याच्या वैयक्तिक आणि करिअर रिलेटेड अपडेट चाहत्यांना देतो. नुकतंच अक्षयने त्याच्या शाळेला भेट दिली. याचा व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांना शाळेची झलक दाखवली आहे. याबरोबरच अक्षयने शाळेसाठी खास पोस्टही लिहिली आहे.
अक्षयने मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतलं आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, "ही माझी मराठी माध्यमाची शाळा – सहकार विद्या प्रसारक मंडळ. इथेच माझं संपूर्ण शालेय शिक्षण झालं. काल पुन्हा शाळेत जायचा योग आला आणि तो ही माझ्या लाडक्या चित्रकला शिक्षक – बोके सरांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने. खूप वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत जाऊन आणि माझ्या सगळ्या शिक्षकांना भेटून खूप आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा एका गोष्टीचा खूप अभिमान वाटला ती म्हणजे – माझ्या शाळेच्या सर्व तुकड्या आजही तितक्याच विद्यार्थीसंख्येने भरलेल्या आहेत जशा माझ्यावेळी असायच्या. मराठी शाळेची अवस्था आणि सद्यस्थिती ही आपण सगळेच जाणतो. पण अश्या काळातही माझी शाळा त्याच ताकदीने उभी आहे याचा खरंच खूप आनंद झाला".
पुढे तो म्हणतो, "मी मराठी शाळेत शिकलो, पुढे माझ्या आवडत्या क्षेत्रात post graduation ही पूर्ण केलं आणि मराठीतून शिक्षण घेतलं या कारणामुळे माझं कुठेच काहीच अडल नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझे सर्व शिक्षक! आता त्यांना सेवा निवृत्तीच्या टप्प्यात बघणं खूप वेगळा अनुभव आहे. बोके सर, तुम्हाला तुमच्या सेवा निवृत्तीनंतर च्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा".
अक्षय केळकरने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. येक नंबर, अबीर गुलाल या मालिकांमध्ये तो झळकला. सध्या तो काजळमाया मालिकेत काम करत आहे. बिग बॉस मराठी ४चा अक्षय विजेता होता. टकाटक, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमांमध्येही तो महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला.
Web Summary : Actor Akshay Kelkar revisits his Marathi-medium school, expressing pride in its continued strength despite challenges faced by Marathi schools. He credits his teachers for his success, emphasizing that Marathi education never hindered his progress. Kelkar has worked in several popular television serials.
Web Summary : अभिनेता अक्षय केळकर यांनी मराठी माध्यमाच्या शाळेला भेट दिली. मराठी शाळांसमोरील अडचणींवर मात करत शाळा उत्तम स्थितीत पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षकांनीच आपल्याला घडवल्याचे ते म्हणाले. मराठीतून शिक्षण घेतल्याने अडचण आली नाही, असेही ते म्हणाले. अक्षयने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.