Adinath Kothare New Serial: सध्या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दर आठवड्याला चढाओढ सुरु असते.त्यामुळे वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. मालिकांचा महासंगम,विशेष भाग प्रसारित केले जातात.त्यात आता छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची नांदी पाहायला मिळते आहे.स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवीन मालिका सुरु होत आहे. अभिनेत्री रुपाली भोसलेची प्रमुख भूमिका असलेली 'लपंडाव' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यात आता मालिकेने आणखी एका मालिकेची झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. शिवाय त्यातील कलाकारांबद्दलही उलगडा केलाय. या मालिकेचं नाव नशीबवान आहे.
येत्या १५ सप्टेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर नशीबवान ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेल्या या बहुचर्चित मालिकेत अभिनेते अजय पूरकर आणि अभिनेत्री प्राजक्ता केळकर या मालिकेत सहाय्यक भूमिकेत आहेत तर अभिनेत्री नेहा नाईक पहिल्यांदाच या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. शिवाय या मालिकेचा मुख्य नायक बनून अभिनेता आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तब्बल ९ वर्षानंतर अभिनेत्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
दरम्यान,'१०० डेज'या मालिकेनंतर आदिनाथ आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.'नशीबवान' मालिकेत तो रुद्र प्रताप घोरपडे हे पात्र साकारत आहे.