Join us  

'गौरव मोरेने हास्यजत्रा सोडली?' खुलासा करत म्हणाला,... गर्लफ्रेंडच्या प्रश्नावरही दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 9:48 AM

गौरव मोरेचे आवडते सहकलाकार कोण? म्हणाला,...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' कलाकार गौरव मोरे (Gaurav More) त्याच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय आहे. त्याची हेअरस्टाईल, विनोदाचं टायमिंग यावर प्रेक्षक फिदा आहेत. तो स्टेजवर आला की पोट धरुन हसण्याची खात्री असतेच. सध्या गौरव मोरे हास्यजत्रामध्ये दिसत नाही. ओंकार भोजनेपाठोपाठ त्यानेही हास्यजत्रेला रामराम केला का अशा चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर गौरवने एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

गौरव मोरेने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यामध्ये तो म्हणाला,'मी हास्यजत्रा सोडलेली नाही. सध्या मी कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे. माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. म्हणून दोन ते तीन महिन्यांचा ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. कारण स्किटची तयारी करताना खूप ओढाताण होते. माझ्या स्किट्समध्ये तर मारामारीही असते. आधीच दुखापत झाली आहे तिथे अजून ताण येतो. तसंच सिनेमाचंही काम सुरु आहे.त्यात ३० ते ३५ दिवस द्यावे लागणार आहेत. म्हणून मी ब्रेक घेतला आहे.'

'गौरव मोरेला गर्लफ्रेंड आहे का?'यावरही त्याने उत्तर दिलं. तो हसतच म्हणाला,'नाही गर्लफ्रेंड नाहीए. मी शोधतही नाहीए. सध्या काम करायचंय.' यावर भार्गवीने त्याची चेष्टा करत थेट बायकोच पाहिजे का? असं विचारलं. यावरही त्याने नाही असंच उत्तर दिलं. गौरव मोरेचे आवडते सहकलाकार कोण? यावर तो म्हणाला,'वनिता खरात आणि ओंकार भोजने' असं उत्तर दिलं. 

गौरव लवकरच प्रसाद ओकसोबत एका मराठी सिनेमात दिसणार आहे. तसंच काही दिवसांच्या ब्रेकनंतर तो पुन्हा हास्यजत्रेत परतणार आहे. तोवर प्रेक्षक मात्र त्याला मिस करणार यात शंका नाही.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताटिव्ही कलाकार