झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिका चांगलीच चर्चेत असते. या मालिकेतील वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांना ही मालिका भावते. अनेकजण या मालिकेला भरभरुन प्रेम दर्शवत असतात. अशातच या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केलाय. या अभिनेत्याचं नाव शुभम पाटील. शुभम हा मूळचा सांगलीचा असून त्याने साखरपुड्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
शुभमच्या साखरपुड्याची चर्चा
मराठमोळा अभिनेता शुभम पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, शुभमने त्याची मैत्रीण सन्मती पाटीलसोबत साखरपुडा केलाय. साखरपुड्याच्या खास व्हिडीओत, शुभम आणि सन्मतीने पारंपरिक लूक परिधान केला असतो. सन्मतीने हिरवी साडी तर शुभमने पांढरा सदरा त्यावर उपरणं परिधान केलं असतं. दोघेही रोमँटिक अंदाजात एकमेकांकडे पाहत चालत येतात. अशातच शुभम सन्मतीला उचलून घेतो. हा व्हिडीओ शेअर करत शुभमने 'भविष्यातले मिस्टर अँड मिसेस पाटील', असं कॅप्शन लिहिलं आहे.
शुभम पाटील मूळचा सांगलीचा राहणारा असून तो सध्या 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत अभिनय करतोय. शुभम साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. शुभम आणि सन्मती गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये असून त्यांनी त्यांच्या मैत्रीला पुढल्या वळणावर घेऊन जाण्याचं ठरवलं आहे. शुभमने साखरपुड्याचा व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन करुन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.