'कौन बनेगा करोडपती' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो सर्वसामान्यांना करोडपती बनण्याची संधी देतो. या शोमध्ये स्पर्धकांना काही प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे कमावण्याची संधी मिळते. 'कौन बनेगा करोडपती'चं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. 'केबीसी १७'चं सूत्रसंचालनही अमिताभ बच्चन करत आहेत. या नव्या पर्वात प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळणार आहे. 'केबीसी १७'मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बेधडक महिला ऑफिसर सहभागी होणार आहेत.
'केबीसी १७'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त 'केबीसी १७'चा खास भाग असणार आहे. या भागात पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या महिला अधिकारी दिसणार आहेत. 'केबीसी १७'च्या हॉटसीटवर कर्नल सोफिया कुरैशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, कमांडर प्रेरणा देवस्थळी बसणार आहेत.
प्रोमोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी निडरपणे ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलत आहेत. "पाकिस्तान हेच करत आला आहे. त्यामुळे धडा शिकवणं गरजेचं होतं", असं सोफिया कुरैशी प्रोमोत म्हणताना दिसत आहेत. सोफिया कुरैशी, व्योमिका सिंग आणि प्रेरणा देवस्थळी यांची एन्ट्री होताच अमिताभ बच्चन "भारत माता की जय" घोषणा देताना दिसत आहेत. 'केबीसी १७'चा हा भाग खास असणार आहे. १५ ऑगस्टला रात्री ९ वाजता प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहता येणार आहे.