Kaun Banega Crorepati 17: 'कौन बनेगा करोडपती'चं नवं १७ वं पर्व (Kaun Banega Crorepati 17) हे ११ ऑगस्टपासून सुरू झालं आहे. यंदाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या पर्वाला पहिला करोडपती मिळाला. उत्तराखंडच्या आदित्य कुमार यांनी एक कोटी रुपये जिंकत यंदाच्या सीझनमधले पहिला करोडपती होण्याचा मान पटकावला. या वर्षीच्या १७व्या सीझनमध्ये इतिहास घडवणाऱ्या आदित्य कुमारने नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्याचा हॉट-सीटपर्यंतचा थरारक प्रवास, अमिताभ बच्चन यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि एक कोटी रुपयांचा प्रश्न जिंकल्यानंतरचे अनुभव शेअर केले आहेत.
अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर ग्लॅमरच्या पलीकडे असलेला त्यांचा साधेपणाने पाहून प्रभावित झाल्याचं आदित्यनं सांगितलं. तो म्हणाला, "मी अवाक झालो होतो. त्यांची आभा काही वेगळीच आहे. त्यात आपुलकी, विनम्रता आणि आश्वासन आहे. मला वाटलं होतं की मी भांबावून जाईन, पण ते इतक्या सहजपणे माझ्याशी बोलले की जणू अनेक वर्षांची ओळख असलेल्या व्यक्तीशी बोलत असल्यासारखे मला वाटले. केवळ अंदाजपंचे उत्तर न देता ज्ञानावर आधार ठेवून खेळल्याबद्दल माझे कौतुकही केले. खरं सांगायचं तर ते जे कौतुक होतं, त्याचं मोल बक्षिसाच्या रकमेपेक्षा जास्त आहे".
केबीसीच्या हॉट सीटवर पोहोचण्यासाठी केलेली तयारी कशी होती, हे सांगताना आदित्यने शिस्त आणि संयमावर भर दिला. तो म्हणाला, "खेळात उत्तम कामगिरी करण्यासाठी शिस्त, धीर आणि दबावाच्या स्थितीत देखील शांत राहण्याची क्षमता आवश्यक असते. ज्ञान आणि हुशारी तुमचे जीवन पालटू शकते, हेच केबीसीमधून सिद्ध होते.
खेळातील सर्वात कठीण क्षण कोणता, असे विचारल्यावर आदित्यने क्षणाचाही विलंब न लावता 'एक कोटीचा प्रश्न' असं म्हटलं. तो म्हणाला, "तुम्हाला उत्तर माहीत असले तरी त्या क्षणाचे जे दडपण असते, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास डगमगू शकतो. मी जरा शांत होऊन श्वास घेतला आणि स्वतःवर विश्वास ठेवला. हा विश्वासच सगळ्यात महत्त्वाचा आहे".
एक कोटीचा प्रश्न समोर आल्यावर त्याच्या मनात काय होते, हे सांगताना तो म्हणाला, "त्यावेळी फक्त पैशाचा सवाल नव्हता, तर तुम्ही केलेली तयारी, शांत राहण्याची क्षमता आणि स्वतःवरील विश्वास हे गुण तुम्हाला खूप पुढे घेऊन जातात हे सिद्ध करायचे होते. १ कोटी हा एक टप्पा आहे, खरे लक्ष्य तर ७ कोटींचे आहे". आदित्यने त्याच्या या विजयाचे श्रेय कुटुंबाला दिलं. तो म्हणाला, "मला हा आनंद माझ्या UTPS उकाई, गुजरातच्या युनिटसोबत साजरा करायचा आहे. आता माझे कुटुंबही इथेच आहे. त्यांनी मला निरंतर साथ दिली आणि हा माझ्याइतकाच त्यांच्याही विजय आहे".