कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मिरा शाहचा (Kashmera Shah) गेल्या आठवड्यात अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये अपघात झाला. कश्मिराच्या नाकाला जखम झाली. त्यामुळे तिच्या नाकावर पट्टी बांधण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी तिने फोटो शेअर करत आपली अवस्था सोशल मीडियावर सांगितली होती. आता नाकावरची पट्टी काढण्यात आली असून कश्मिराने तिची हेल्थ अपडेट दिली आहे.
कश्मिरा शाहने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या नाकावरची पट्टी काढण्यात आली आहे. तसंच नाकावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. अमेरिकेतील डॉक्टरांसोबत तिने फोटो शेअर केला आहे. यात कश्मिरा हसताना दिसत आहे. ती लिहिते, "अखेर पट्टी काढली. जास्त मोठी खूण राहणार नाही हे ऐकून बरं वाटलं. आता वेळच सगळं नीट करेल. जखम वेगाने भरत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनेसाठी खूप आभार. कुटुंब आणि मित्रपरिवाराव्यतिरिक्त आपल्या बाजूला एवढी मोठी सोशल मीडिया फॅमिलीही आहे हे पाहून मला बळ मिळालं. सगळ्यांना खूप प्रेम. आणि माझ्या प्रेमळ नवऱ्याचेही आभार जो अपघाताबद्दल समजताच लगेच फ्लाईट पकडून येणार होता. तू माझं बळ आहेस. माझ्या डॉक्टरांचेही खूप आभार."
कश्मिरा शाह पती आणि मुलांसोबत लॉस एंजिलिस येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. नंतर कृष्णा आणि मुलं भारतात परतले मात्र कश्मिरा तिथेच थांबली होती. दरम्यान एक दिवस मॉलमध्ये फिरताना ती आरशाला जोरात धडकली. काचा उडाल्याने तिच्या नाकाला मोठी जखम झाली. अतिशय भयानक असा हा अपघात होता. रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो कश्मिराने शेअर केला होता. इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. कश्मिरा आता लवकरच भारतात परत येणार आहे.