Join us

कशिश कपूरच्या घरी नोकरानेच केली चोरी, रंगेहाथ पकडल्यावर अभिनेत्रीला दिली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:03 IST

'बिग बॉस' फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी नोकरानेच चोरी केली.

Kashish Kapoor Cook Robbery Incident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्री कशिश कपूर एका चोरीच्या प्रकारामुळे चर्चेत आली आहे. कशिशच्या घरातून तब्बल ७ लाख रुपयांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी तिच्याच घरात काम करणाऱ्या नोकराने केली असल्याचा आरोप तिने केला आहे. १३ जुलै रोजी ही बातमी पसरल्यानंतर कशिशने स्वतः याबाबतचा एक यूट्यूब व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. या व्हिडीओमध्ये ती खूपच भावनिक झाली होती. 

कशिश कपूरने आपल्या नोकराविरुद्ध पोलीस तक्रार केली आहे. रविवारी १३ जुलै रोजी कशिशने एक यूट्यूब व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये धक्कादायक गोष्टी उघड केल्यात. तिने सांगितलं की, घरात ठेवलेले ७ लाख रुपये ती तिच्या आईच्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या तयारीत होती. परंतु, सिंगापूरच्या ट्रिपच्या आदल्या दिवशी जेव्हा ती पैसे घेण्यासाठी लॉकर उघडते, तेव्हा तिथे पैशांचा पाकिट रिकामं आढळलं. तिचा नोकर नुकताच गेला होता हे लक्षात आल्यावर तिने त्याला लिफ्टमध्ये थांबवले आणि परत येण्यास सांगितले. तिनं त्याचा खिसा तपासल्यावर त्याच्या खिशातून ५० हजार रुपये मिळाले. पैसे सापडल्यानंतर कशिशने पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सचिनने तिला अडवलं. तिचे हात पकडले आणि तिला भिंतीवर ढकलले. "कोणालाही सांगू नकोस!" अशीही धमकीही त्यानं तिला दिली. 

कशिश पुढे म्हणाली, "त्याच्या खिशात ५० हजार रुपये दिसल्यावर मला खात्री पटली की चोरी त्यानेच केली आहे. मी फोन उचलायला गेले, पण त्याआधीच त्याने माझे दोन्ही हात धरले आणि मला भिंतीवर जोरात आदळलं. तो म्हणाला, 'फोन करू नकोस आणि कोणालाही काही सांगू नकोस. त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच विचार होता, स्वतःचं संरक्षण करायचं आहे. मी त्याला शांतपणे म्हणाले, ठीक आहे, माझ्या घरातून बाहेर पड आणि पुन्हा कधीच मला तुझा चेहरा दाखवू नकोस". 

नोकर घराबाहेर पडताच तिनं तिने सोसायटीच्या गार्डला फोन केला, पण नेटवर्क समस्येमुळे संपर्क लगेच झाला नाही.यानंतर कशिश स्वतः २०व्या मजल्यावरून पायऱ्यांनी धावत उतरली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून सचिनला अटक करण्यात आली. तथापि, पोलिसांनी कशिशला सांगितलं की, चोरलेले संपूर्ण ७ लाख रुपये मिळतील याची हमी देऊ शकत नाहीत. कशिश कपूरच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारचोरी