इंडियन आयडल या कार्यक्रमातून मान्या नारंग आणि भारती गुप्ताने घेतला प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 11:37 IST
इंडियन आयडलच्या या पर्वात सोनू निगम, फराह खान आणि अन्नू मलिक परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहेत. हे तिघेही इंडियन आयडलच्या ...
इंडियन आयडल या कार्यक्रमातून मान्या नारंग आणि भारती गुप्ताने घेतला प्रेक्षकांचा निरोप
इंडियन आयडलच्या या पर्वात सोनू निगम, फराह खान आणि अन्नू मलिकपरीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहेत. हे तिघेही इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वात परीक्षकाच्या खुर्चीत बसले होते. इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाची प्रचंड चर्चा झाली होती. त्यामुळे पहिल्या पर्वातील परीक्षक पुन्हा या सिझनमध्ये असल्याने हा सिझन चांगलाच हिट ठरला आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज एकाहून एक सरस आहेत. नुकत्याच झालेल्या भागात भारती गुप्ता आणि मान्या नारंग यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला.हरदीप, भारती, जेली, एलव्ही रेवंथ, मानसी आणि मान्या या सहाजणांमधून दोन जणांना कार्यक्रमातून बाहेर पडावे लागणार होते. एलिमिनिटेड राऊंडमध्ये हरदीपने बॉस या चित्रपटातील हर किसी को हे गाणे गायले तर भारतीने तलाश चित्रपटातील जी ले जरा हे गाणे गायले. हरदीपच्या परफॉर्मन्सचे सगळ्याच परीक्षकांनी कौतुक केले पण भारतीचे काही सूर लागले नसल्याचे परीक्षकांनी सांगितले. या दोघांनंतर जेलीने बजरंग भाईजान या चित्रपटातील तू जो मिला हे गाणे गायले. त्याने गायलेले गाणे फराहला आवडले. पण गाण्यात काही त्रुटी असल्याचे सोनूचे म्हणणे होते. एलव्ही रेवंथने खामोशिया या चित्रपटाचे शीर्षक गीत इतक्या सुंदरपणे गायले की, सगळ्यांना एक आर्श्चयाचा धक्का बसला. त्याच्यानंतर मानसीने तीन पत्ती या चित्रपटातील नीयत खराब है हे गाणे गायले. मानसीचे गाणे सगळ्यांना आवडले. मानसीनंतर मान्याने लता मंगेशकर यांनी गायलेले रंगीला रे हे गाणे गायले. पण तिला परीक्षकांना इम्प्रेस करता आले नाही. इंडियन आयडलमधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूप चांगले असले तरी सोनू, अन्नू आणि फराहला एलिमिनेशनसाठी दोन स्पर्धकांची निवड करायची होती. त्यामुळे त्या तिघांनी चर्चा करून भारती आणि मान्या कार्यक्रमाचा निरोप घेणार अशी घोषणा केली. इंडियन आयडलच्या पुढच्या भागांमध्ये स्पर्धक आता कोणत्या गाण्यांनी परीक्षकांना आणि लोकांना इम्प्रेस करतात हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.