Join us

स्त्री प्रधान भूमिकांना प्राधान्य देईल -एरिका फर्नांडिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:28 IST

एरिका फर्नांडिस आगामी प्रसिद्ध शो ‘कसौटी जिंदगी की’ च्या दुसऱ्या  सिझनमध्ये प्रेरणाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एरिकाने कन्नड, तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

-रवींद्र मोरे  

भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल एरिका फर्नांडिस आगामी प्रसिद्ध शो ‘कसौटी जिंदगी की’ च्या दुसऱ्या  सिझनमध्ये प्रेरणाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एरिकाने कन्नड, तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटातही काम केले आहे. २०१४ मध्ये रिलीज झालेला ‘बबलू हॅपी है’ हा एरिकाचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट. एकंदरीत तिच्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत तिच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...

* या शोमध्ये तू प्रेरणाची भूमिका साकारत आहे, तर भूमिकेला न्याय देण्यासाठी तयारी कशी केली?- खऱ्या  आयुष्यात एरिका जशी आहे, तशीच या शोेमधली प्रेरणा आहे. त्यामुळे जास्त तयारी करण्याची गरज भासली नाही. चुलबूली, फ्रेंडली, मौजमस्ती करणारी एरिका या शोमधली प्रेरणासारखीच आहे. या शोमध्येही प्रेरणा  माझ्या स्वभावासारखीच दाखविण्यात आली आहे. या भूमिकेप्रमाणेच मी असल्याने मला जास्त मेहनत घेण्याची गरज पडली नाही. मात्र मी हिंदी असल्याने बंगाली भाषेची तयारी करावी लागली आणि एकता मॅमने चांगल्या प्रकारे ती तयारी करुन घेतली. 

* शूटिंगचा अनुभव कसा होता?- आतापर्यंतचा अनुभव खूपच मजेदार होता. शिवाय आताही शूटिंग सुरुच आहे. को-स्टार, अ‍ॅक्टर्स हे सर्व जवळपास सारख्याच वयोगटाचे असल्याने सेटवर खूपच मौज-मस्ती होत असते. मात्र मौज-मस्ती करत असताना एकता मॅमची एन्ट्री ही टिचर सारखी वाटते. एकता मॅमला पाहून सेटवर सुरू असलेली सर्वच मस्ती थांबते.

* पार्थसोबतची केमिस्ट्री कशी वाटली?- पार्थ समथान हा या शोमध्ये अनुराग बासुची भूमिका साकारत आहे. यात आमची प्रेमकथा दाखविण्यात येत असून त्याच्यासोबतची केमिस्ट्री विशेष वाटत आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभवही वेगळाच येत आहे. पार्थ हा खूपच उमदा कलाकार आहे शिवाय तेवढाच उमदा व्यक्तीदेखील आहे. विशेष म्हणजे आम्ही दोघेही एकत्र पहिल्यांदाच शूटिंगनिमित्त कलकत्त्याला भेट दिली. त्यामुळे खूपच वेगळे फिल होत आहे. आम्ही सोबत १६ ते १७ तास काम करतोय, मात्र कधीही असे वेगळे वाटले नाही. 

* तू कोणत्या प्रकारच्या भूमिकांना प्राधान्य देते? - प्रत्येक भूमिकांमध्ये हा अभिनय आलाच. म्हणून मला अभिनय करण्याची संधी मिळणे हाच माझा प्रयत्न असतो. मी अभिनयालाच प्राधान्य देते. मात्र शॉर्ट भूमिका त्यातच बॅकग्राउंड भूमिका टाळते. मुख्य भूमिका किंवा लॉँग भूमिकांना महत्त्व देते. आणि विशेषत: स्त्री प्रधान भूमिकांना तर आवर्जून प्राधान्य देते. कारण या भूमिकेला मी चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकते, असे मला वाटते.

* अभिनय क्षेत्रात काम करत असताना या इंडस्ट्रीकडून काय अपेक्षा आहेत?- या क्षेत्रात यायला मला जास्त काळ झाला नाहीय, फक्त अडीच ते तीन वर्ष झाले आहेत. त्यामुळे जास्त अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरेल आणि मी अजून एवढी मोठीही झाली नाही की एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीकडून अपेक्षा करावी. मात्र हे नक्की सांगू शकते की, कामात नियमितता असावी. याठिकाणी अ‍ॅक्टर्सपासून ते डायरेक्टर्सपर्यंत सर्वांचीच धावपळ सुरु आहे. त्यामुळे गोंधळही बराच दिसून येतो. कामात शिस्तता राहिली की, एवढा गोंधळ उडणार नाही. 

* तू कन्नड, तमिळ आणि तेलुगुमध्येही काम केले आहे. तर हिंदीमध्ये काम करत असताना नेमका काय फरक जाणवतो?- हिंदी ही माझी भाषा आहे. याठिकाणी मी सध्या मालिकांमध्ये काम करत आहे. दोन्ही ठिकाणी कामाचा पॅटर्न सारखाच आहे, मात्र साऊथमध्ये शिस्तता खूपच दिसून येते. या उलट हिंदीमध्ये तेवढी शिस्तता दिसून येत नाही. त्याठिकाणी वेळेचे, कामाचे बंधन आहे, पण इथे नाही. याठिकाणी एकजण अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसतो. मात्र त्याठिकाणी तसे दिसत नाही. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2