Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेमांगी कवीचे या मालिकेद्वारे होणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 13:51 IST

चित्रपट नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने ठसा उमटविलेली हेमांगी आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ती एका मालिकेत योगा टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी युवा या वाहिनीवरील 'फुलपाखरू' या मालिकेला अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे-फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. आता या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी फुलपाखरू मालिकेत योगा टीचर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.चित्रपट नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने ठसा उमटविलेल्या हेमांगीने फुलपाखरू मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हेमांगी या मालिकेत एका योगा टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे तिच्या या नवीन पात्राला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात शंकाच नाही. छोट्या पडद्यावरील तिच्या पुनरागमनाबद्दल बोलताना हेमांगी सांगते, "माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून झाली. त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. फुलपाखरूची संपूर्ण टीम खूपच एनर्जेटिक आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना देखील खूप मजा येतेय. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि या पुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील याची मला खात्री आहे."हेमांगी कवीने फक्त लढ म्हणा, डावपेच, कोण आहे रे तिकडे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ठष्ट, ती फुलराणी या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे. हेमांगी ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली कवियत्री असून ती नेहमीच तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर कविता पोस्ट करत असते आणि तिच्या या कवितांचे कौतुक तिच्या फॅन्सकडून देखील केले जाते.