अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. श्रेयसने झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत होती. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर त्याचे चाहते त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता तो लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तो चल भावा सिटीत (Chal Bhava Cityt) या कार्यक्रमात दिसणार आहे.
नुकतेच झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवर चल भावा सिटीत शोचे शीर्षक गीत शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात होतात..तेच घेऊन आलाय अभिनेता श्रेयस तळपदे ‘चल भावा सिटीत’ या भन्नाट कार्यक्रमाचं, नवकोरं शीर्षकगीत...! नवा कार्यक्रम ‘चल भावा सिटीत’ १५ मार्चपासून दररोज रात्री ९.३० वाजता. या व्हिडीओत स्पर्धकांसोबत श्रेयस तळपदे पाहायला मिळतोय. गायत्री दातार रिमोटने टीव्ही ऑन करते. मग एन्ट्री होते श्रेयसची. तो बोलताना दिसतो की, वेलकम टू महाराष्ट्राचा बिगेस्ट रिएलिटी शो चल भावा सिटीत. इथे गावात सिटी नाही, सिटीत गाव गाजतंय. कसं वाटतंय. त्यानंतर शोचे शीर्षक गाण्यावर स्पर्धकांसोबत श्रेयस थिरकताना दिसतो आहे.
'चल भावा सिटीत' शोबद्दल'चल भावा सिटीत' हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. या स्पर्धकांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील. चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच.