शशांक केतकर (Shashank Ketkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेत काम करताना दिसतो आहे. शशांक अनेकदा सामाजिक विषयांवर व्हिडीओ बनवतो. यामुळे अनेकदा त्याला ट्रोलही केलं जातं. पण तरीदेखील तो आजूबाजूच्या समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. आता त्याने काल म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने भारत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि छोट्या छोट्या समस्या अधोरेखित करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलंय.
शशांक केतकरने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणाला की, ''अनेक जणांना वाटत असेल शशांक कशाला असले व्हिडीओ करतोस खड्ड्यांचे, रस्त्यांचे आणि कचऱ्यांचे व्हिडीओ. नियम न पाळणाऱ्यांचे व्हिडीओज. त्यांनी काय होणार नाहीये. तुझ्या असल्या प्रयत्नांमुळे भारत सुधारला ना तर आणखी काय पाहिजे. असं बऱ्याच जणांचं मत असेल मला माहित्येय. मला बरेच जण हसतात हे सुद्धा मला माहित आहे. म्हणजे अगदी जवळची अनेक मंडळी आहेत. काही नातेवाईक आहेत. काही सहकलाकार, काही शत्रू आहेत. तर सगळे मला हसतात हेही मला माहित आहे. पण मला हसणारे, माझी निंदा करणारे किंवा माझ्या विचारांना सपोर्ट करणारे या सगळ्यांसाठीच मला इतकेच सांगायचंय. मी जे काही व्हिडीओ करत असतो. ते खरंतर तुमच्या सगळ्यांच्या मनात असतं. पण तुमच्या मनात फक्त भीती आहे आणि उदासिनता आहे. तर ही जी निगेटिव्हिटी आहे तुमच्या मनातली. याने काय होत नसतं रे. तर त्यापेक्षा कदाचित तुम्हाला सुद्धा समाधानाची झोप लागावी असं वाटत असेल आपण काहीतरी केलं. असं जर वाटावंस वाटत असेल तर या व्हिडीओकडे जरा गांभीर्याने पाहा. तुम्हालाही अशातलं जर काही करता आलं तर जरुर करा. कारण आपल्या अशा छोट्या छोट्या प्रयत्नानेच आपला भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. '' असं म्हणत त्याने एका ठिकाणची कचऱ्याची परिस्थिती दाखवली. शेवटी त्याने विनंती केलीय की, ''कचरा गोळा करण्यासाठी ४-६ पालिकेची गाडी उभी असते. त्यापेक्षा कायमस्वरुपी त्यावर तोडगा काढता येईल का. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल तेव्हाच भारत स्वच्छ होईल आणि खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होईल. ''
व्हिडीओ शेअर करत शशांकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारत आणखी एका वर्षानी मोठा झाला! म्हणजे हा भारताचा वाढदिवस! येणारं पुढील वर्ष भारतासाठी स्वच्छ, आणि आनंददायी जावो हीच प्रार्थना. माझ्या अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून भारत स्वच्छ होईल का ? मला माहीत नाही. पण निदान माझा परिसर तरी स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त एकदा हे सगळ्यांनी ठरवलं की झालाच भारत स्वच्छ. आता कृपा करून, हा पक्ष… तो पक्ष या गप्पा मारू नका.. त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. जे सत्तेत आहेत आणि जे आधी होते, दोन्ही वेळेला अस्वच्छता ही भारताची ओळख राहिलेलीच आहे. काहीही असो कोण सत्तेत आहे, आम्हाला…सामान्य नागरिकाला स्वच्छ परिसर मिळावा, शुद्ध हवा मिळावी…या काही अवाजवी अपेक्षा नाहीत. भारत उत्तम प्रगती करतोय यात वाद नाही. ‘स्वच्छ भारत’ मोहीम सुद्धा कौतुकास्पद आहे पण. '' शशांकच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. अनेकांनी त्याचे कौतुकदेखील केलंय.