प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी विजेता' तसेच 'लाफ्टर शेफ सीझन २'चा विजेता एल्विश यादव याच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला आहे. गुरुग्राम सेक्टर ५६ येथे एल्विशच्या घरावर गोळीबार करण्यात आला. मात्र त्यावेळी एल्विश यादव घरात उपस्थित नव्हता. घटनेच्या वेळी घरात फक्त केअरटेकर होता, ज्याने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. अचानक घडलेल्या घटनेमुळे एल्विश आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे.
एल्विशच्या घरावरील गोळीबाराचे CCTV फुटेज एल्विशच्या फॅन पेजवर शेअर केले गेले आहे. ज्यात दोन जण धडाधड घरावर गोळ्या झाडताना दिसत आहेत. घराच्या दारे आणि भिंतींवर गोळ्यांचे निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. गोळीबारानंतर स्थानिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची तपासणी केली. आरोपींचा चेहरा झाकलेला होता, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र तपास सुरू असून, लवकरच त्यांना अटक होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.
एल्विशच्या गुरुग्राममधील घरावरील अंदाधुंद गोळीबाराची जबाबबारी नीरज फरीदपूर आणि भाऊ रीतुलिया या गुंडांनी घेतली आहे. नीरज आणि भाऊ दोघेही गँगस्टर हिमांशू भाऊ टोळीशी संबंधित आहेत. या गँगला भाऊ गँग म्हणून ओळखले जाते. एल्विश यादवने एका बेटिंग अॅपची जाहिरात केली आहे. या बेटिंग अॅपने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. एल्विश यादव अशा अॅपची जाहिरात करत आहे. म्हणूनच त्याच्या घरी गोळीबार करण्यात आला आहे, असे या भाऊ गँगने सोशल मीडियावरील पोस्टवर म्हटले आहे.
१६ बीएचके आलिशान घर, १० कोटींचा खर्च
एल्विश यादव आता यूट्यूबवरच नव्हे तर टीव्ही आणि ग्लॅमरस जगातही प्रसिद्ध आहेत. त्याचा महागडा आलिशान बंगला गुरुग्राममध्ये बांधला आहे. हे घर १६ बीएचके असून, त्याची किंमत अंदाजे १० कोटी रुपये आहे. याशिवाय, दुबईमध्ये त्याचे ८ कोटी रुपयांचे घरही आहे.