Join us

"'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल करायचा नव्हता पण...", एकता कपूरचा खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:07 IST

'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल करायचा नव्हता असा खुलासा नुकताच एकता कपूरने केला आहे. मालिकेच्या सीक्वलबाबत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. 

'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल २५ वर्षांनी या गाजलेल्या मालिकेचा सीक्वल येत असल्याने चाहतेही आतुर आहेत. पण, 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल करायचा नव्हता असा खुलासा नुकताच एकता कपूरने केला आहे. मालिकेच्या सीक्वलबाबत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. 

"'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिकेला २५ वर्ष पूर्ण होत आल्यानंतर ही मालिका पुन्हा टीव्हीवर घेऊन यायचा विचार सुरू होता. पण, यासाठी मी सुरुवातीला नाही म्हटलं होतं. कारण, या मालिकेशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आणि टेलिव्हिजनचं माध्यमही आता खूप बदललं आहे. आता वेगळे प्लॅटफॉर्मही आले आहेत. हे सगळं 'क्योंकी सास भी कभी बहु थी' पूर्वीसारखं सांभाळू शकेल का? ती मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल होती. जो टीआरपी नंतर कोणत्याही मालिकेला मिळाला नाही", असं एकता कपूरने म्हटलं आहे. 

मालिकेमुळे महिलांना मिळाली प्रेरणा!

एकता कपूर पुढे म्हणते, "पण, फक्त टीआरपी ही या शोची शोभा नव्हती. तर एका इंटरनॅशनल रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे की या मालिकेने अनेक भारतीय महिलांना आवाज दिला. या मालिकेमुळे महिला घरातल्या संभाषणात सहभाग घेऊ लागल्या. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' आणि कहानी घर घर की या मालिकेमुळे महिलांना प्रेरणा मिळाली. हा फक्त एक डेली सोप नव्हता. तर यामुळे घरगुती हिंसाचार, वैवाहिक बलात्कार, इच्छामृत्यू यांसारख्या अनेक विषयांच्या चर्चा घराघरात होऊ लागल्या. पण, मालिका अचानक बंद झाल्यामुळे चाहते नाराज होते". 

...म्हणून 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल येतोय! 

आता २५ वर्षांनी पुन्हा लोकांना प्रेरित करायला, त्यांचं मनोरंजन करायला, त्यांचे विचार बदलायला आणि एक बदल घडवण्याच्या दृष्टीने ही मालिका पुन्हा घेऊन येत आहोत. 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा नवीन प्रवास सुरू होत आहे. जुन्या आठवणींसोबत आपण कधीच जिंकू शकत नाही. पण, हा प्रवास जिंकण्याचा नाही तर काहीतरी बदल घडवण्याचा आहे. दरम्यानस 'क्योंकी सास भी कभी बहु थी' येत्या २९ जुलैपासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :एकता कपूरटिव्ही कलाकारस्मृती इराणी