Join us

या कारणामुळे सनी देओलने खाल्ला होता धर्मेंद्र यांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 08:30 IST

धर्मेंद्र यांनी आपल्या मोठ्या मुलावर म्हणजेच सनी देओलवर एकदा हात उचलला होता. याचा किस्सा त्यांनी नुकताच इंडियन आयडल या कार्यक्रमात सांगितला.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकताच इंडियन आयडॉल कार्यक्रमाचा नवा सिझन सुरू झाला असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियन आयडॉल १० चा येत्या वीकएंडचा भाग हा मनोरंजनाने भरगच्च भरलेला असणार आहे. ज्यात महान अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची मुले सनी आणि बॉबी देओल उपस्थित असणार आहेत. त्यांच्यामुळे कार्यक्रमाचे ग्लॅमर नक्कीच शिगेस पोहोचेल. बॉलिवूडमधील या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे आणि या भागात ते प्रेक्षकांना मनमुराद हसवणार आहेत. या कार्यक्रमात जेव्हा मनीष पॉल धर्मेंद्र यांच्यासोबत रॅपिड फायर खेळले, तेव्हा त्याने धर्मेंद्र यांना सनी आणि बॉबी या त्यांच्या मुलांबद्दल विचारले, त्यावर धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांचे काही रोचक किस्से ऐकवले. जेव्हा मनीषने त्यांना विचारले की, दोघांपैकी त्यांचा अधिक लाडका कोण आहे, तेव्हा ते म्हणाले की, एक त्यांचा डावा डोळा आहे तर एक उजवा. ते म्हणाले की, दोघांमुळे त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे आणि त्यांचे त्या दोघांवर सारखेच प्रेम आहे. जेव्हा त्यांना विचारले की, त्या दोघांपैकी लहानपणी पैसे कोण चोरत असे? त्यावर त्यांनी सांगितले की, त्यांच्या मागणी पेक्षा मी त्यांना जास्त पैसे पुरवत असल्यामुळे पैसे चोरण्याची वेळ त्यांच्यावर आलीच नाही. धर्मेंद्र यांनी आपल्या मोठ्या मुलावर एकदा हात उचलला होता. याचा किस्सा देखील त्यांनी सांगितला. जेव्हा सनी तरुण होता, त्यावेळी धर्मेंद्र यांनी त्याला एक खेळण्यातली बंदूक भेट दिली होती. सनीने त्यात खोट्या गोळ्या घालून त्या घरातील सर्व आरशांवर मारल्या होत्या आणि सर्व आरसे फोडले होते. त्यामुळे धर्मेंद्र यांना प्रचंड राग आला होता. पण त्यावेळी इतका राग आपल्याला का आला याची त्यांनी आजही खंत वाटते. हे सांगता सांगता धर्मेंद्र यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते आणि त्यांनी अभिमानाने सांगितले की, त्यांची दोन्ही मुले बहुमोल हिरे आहेत आणि त्यांचे त्या दोघांवर खूप प्रेम आहे.

टॅग्स :धमेंद्रसनी देओलइंडियन आयडॉल