Misha Agrawal Dies 2 Days Before Birthday: प्रसिद्ध रीलस्टार मिशा अग्रवालच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मीशा २६ एप्रिल रोजी वाढदिवस होता. पण, तिनं वाढदिवसाच्या दोन दिवस आधी २४ एप्रिल रोजी या जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी स्वतः एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. तिच्य अचानक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. मीशाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मीशाच्या कुटुंबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहलंय की, "आम्हाला हे सांगताना दु:ख होतय की, मीशा अग्रवाल हिचं निधन झालं आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल धन्यवाद. आम्ही अजूनही यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया तिला तुमच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा". मिशा आता या जगात नाही, यावर तिच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत "हा प्रँक तर नाही ना" असा प्रश्न विचारला आहे.
मिशाची मैत्रिण मिनाक्षीनं पोस्ट शेअर करत लिहलं, "कालपासून मला मेसेजेसचा पूर येत आहे, प्रत्येकजण विचारत आहे की काय झालं. ती आता आपल्यात नाही आणि ती ज्या पद्धतीने आपल्याला सोडून गेली आहे ते हादरवून टाकतंय. आमच्यापैकी कोणालाही लक्षात आले नाही की तिने ४ एप्रिलपासून काहीही पोस्ट केली नव्हती". मिनाक्षीच्या पोस्टवरुन मिशानं आत्महत्या केल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. मिशा ही विनोदी रील्स बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध होती. तिचे तीन लाख फॉलोअर्स होते. ती विविध विषयांवरील मजेशीर व्हिडीओ पोस्ट करायची. नेटकऱ्यांना तिच्या रील प्रचंड आवडायच्या.