कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार (Dhananjay Powar) यास सगळे डीपी दादा म्हणूनच ओळखतात. युट्यूब आणि इन्स्टा व्हिडिओंमधून डीपी दादा घरोघरी पोहोचला. नंतर 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात त्याने एन्ट्री घेतली. तिथेही धनंजयने सर्वांचं मन जिंकलं. कायम हसतमुख आणि इतरांनाही हसवणारा डीपी आता पुन्हा चर्चेत आलाय. धनंजय पोवारचं कोल्हापूरात स्वतःचं फर्निचरचं दुकान आहे. पण, त्यानं आता फर्निचर नाही तर एका नव्या क्षेत्रात उडी घेतली आहे.
धनंजय पोवारने त्याच्या 'डीपी दादा डॉट कॉम' या ब्रँड अंतर्गत चष्मा आणि गॉगल विक्रीचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या या पहिल्या दुकानाचे उद्घाटन १९ ऑगस्ट रोजी अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या ग्रँड उद्घाटनाच्या सोहळ्याला 'बिग बॉस मराठी ५' मधील त्याचे जवळचे मित्र पोहचले होते. यात सूरज चव्हाण, वैभव चव्हाण, पुरुषोत्तम पाटील, घनःश्याम दरवडे (छोटा पुढारी) आणि जान्हवी किल्लेकर यांचा समावेश होता. या सर्व सेलिब्रिटींनी डीपी दादाला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या नव्या व्यवसायासाठी भरभरून कौतुक केलं. स्मार्ट इचलकरंजी या इन्स्टापेजवर द्घाटन सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात धनंजय पोवार टॉप ४ पर्यंत पोहोचला होता. पण, अवघ्या काही पावलांवर त्याचं ट्रॉफीचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं. या शोमधून बाहेर पडल्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. या शोमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर तो स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातही दिसला होता. आता व्यवसायाच्या जगातही त्याने यशस्वी पाऊल ठेवलंय. डीपी दादाच्या नवीन दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.