Join us

'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

By कोमल खांबे | Updated: August 18, 2025 10:17 IST

खंडेरायाच्या जेजुरीत देवदत्त नागे घर बांधत आहे. अभिनेत्याने जेजुरीच्या पायथ्याशी जमीन खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे.

'जय मल्हार' ही लोकप्रिय ठरलेली ऐतिहासिक मराठी मालिका. या मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारून अभिनेता देवदत्त नागे याने प्रसिद्धी मिळवली. अजूनही देवदत्त नागेने साकारलेल्या खंडेरायाची छबी ही लोकांच्या मनात कायम आहे. देवदत्त नागेने खंडेरायाच्या भूमिकेनंतर आणखीही बऱ्याच भूमिका साकारल्या. पण, या भूमिकेला मिळालेलं प्रेम कुठल्याच भूमिकेला मिळालं नाही. आता देवदत्त नागेने त्याच्या चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. 

खंडेरायाच्या जेजुरीत देवदत्त नागे घर बांधत आहे. अभिनेत्याने जेजुरीच्या पायथ्याशी जमीन खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. देवदत्त नागे घर बांधत असलेल्या ठिकाणावरुन खंडेरायाच्या जेजुरी गडाचं दर्शन होतं. अभिनेत्याने बहिणीच्या हस्ते भूमीपूजन करत घर बांधण्यास सुरुवात केली आहे. "येळकोट येळकोट…जय मल्हार. श्री खंडेरायांच्या कृपेने, साक्षात श्री खंडेरायांच्या सानिध्यात माझे स्वतःचे घर जेजुरी मध्ये…श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा रुजू झाली हे माझे परम भाग्य", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे तो म्हणतो, "माझी बहीण सौ.अमृता ताई आणि माझे भाऊजी श्री. संदिपजी घोणे ह्यांच्या शुभ हस्ते भुमी पुजन आणि जिथे घर उभे राहणार आहे तिथे श्री खंडेरायांचे जागरण गोंधळ म्हणजे केवळ आनंद सदानंद 🙏🏻 बा…श्री खंडोबा… आता मना मध्ये येईल तेव्हा तुझ्या सानिध्यात राहायला मिळणार मला... तुझी सेवा माझ्या कडून निरंतर घडणार...माझ्या कडून तुझी सेवा अशीच घडू दे रे बा. सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट.. जय मल्हार". देवदत्त नागेला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :देवदत्त नागेजेजुरीमराठी अभिनेता