लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशी बहुगुणी ओळख असलेला चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. चिन्मयने आजपर्यंत अनेक मालिकांचं लेखन केलं आहे. तसंच काही मालिकांमध्ये अभिनयही केला आहे. त्याचे सिनेमेही गाजले आहेत. नुकतंच त्याने मनातील खदखद बोलून दाखवली आहे. लेखकाला इंडस्ट्रीत मानच मिळत नाही असं तो म्हणाला आहे.
'वादळवाट', 'तू तिथे मी' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये दिसलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर. 'अजब गजब'ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकर म्हणाला," अनादि अनंत काळापासून हीच रड आहे. लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही. हे वर्षानुवर्षे लोक हेच म्हणतात की इंडस्ट्रीत लेखकच नाही यार. जो आहे त्याचं नाव तुम्हाला पोस्टरवरही द्यायचं नाही. तुम्हाला कोरिओग्राफरचं नाव पोस्टरवर द्यायचंय. पण लेखकाचं नाव कधीच नाही. त्यासाठी भांडावं लागतं. मुळात लेखन ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्यात सर्वांनी मिळून त्यात लक्ष घातलं पाहिजे हे इंडस्ट्रीलाच वाटायला खूप उशीर लागला आहे. आताही ते शंभर टक्के वाटतं अशातला भाग नाही."
तो पुढे एक किस्सा सांग म्हणाला, "माझ्या मित्राने एक सिनेमा लिहिला त्याचं नाव अमुक मानधन मिळालं. नंतर त्याला कळलं की आयटम साँग करणारी जी आर्टिस्ट होती तिला त्याच्यापेक्षा तिप्पट जास्त मानधन मिळालं होतं. हा प्रॉब्लेम आहे. मी जर अभिनेता नसतो तर मला जो आज लेखक म्हणून मान मिळाला त्याच्या अर्धाही मिळाला नसता."