Join us

एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेच्या सेटवर लहान मुलाला गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 15:42 IST

मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अपघात होणे आणि त्यात कलाकारांना दुखापत होणे यात काही नवीन नाही. पण एक श्रृंगार स्वाभिमान या ...

मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अपघात होणे आणि त्यात कलाकारांना दुखापत होणे यात काही नवीन नाही. पण एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका अपघातात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला. एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेचे चित्रीकरण मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये सुरू होते. फिल्म सिटीत घनदट जंगल असून तिथे नेहमीच अनेक प्राण्यांचा वावर असतो. येथेच चित्रीकरण करत असताना एक अपघात झाला. एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेसाठी खूपच छान सेट फिल्म सिटीमध्ये बांधण्यात आलेला आहे. या सेटच्या जवळच एक मुलगा खेळत होता. त्यावेळी त्या मुलाला बिबट्या उचलून घेऊन गेला आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला.एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेच्या सेटच्या जवळ एक दोन वर्षांचा मुलगा खेळत होता. त्याचवेळी बिबट्याने त्या लहान मुलावर हल्ला केला आणि त्या मुलाची मान तोंडात पकडून तो त्याला घेऊन गेला. लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे काही अंतरावर गेल्यावर बिबट्याने लहान मुलाला फेकून दिले. पण यादरम्यान त्या मुलाला चांगलीच दुखापत झाली. तो मुलगा रक्तबंबाळ झाला होता. त्यामुळे त्या लहान मुलाला उचलून लगेचच रुग्णायलात नेण्यात आले. पण तरीही त्याचा जीव वाचू शकला नाही. ही घटना घडली त्यावेळी एक श्रृंगार स्वाभिमान या मालिकेतील काही कलाकार आणि या मालिकेचे दिग्दर्शक देखील तिथे उपस्थित होते. ते सगळे देखील त्या मुलाला वाचवण्यासाठी धावले होते. पण तोपर्यंत बिबट्याने त्या मुलाला चांगलीच दुखापत केली होती.