Join us

Bigg Boss Marathi 3 :दादूसच्या लहानपणी दोन्ही पायांमध्ये होतं अपंगत्व, पण या व्यक्तीमुळे तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:59 IST

आगरी कोळी समाजातून बिग बॅास मराठीमध्ये झळकणारा दादूस हा पहिलाच कलाकार असेल.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. यंदाच्या तिसऱ्या सीझनमध्ये बिग बॅास मराठीच्या घरात दिसणार आहे मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस. आगरी कोळी समाजातून बिग बॅास मराठीमध्ये झळकणारा दादूस हा पहिलाच कलाकार असेल. 

दादूस म्हणजे संतोष चौधरी. मूळ गाव भिवंडीतील कामतघर. शाळेपासूनच गायनाची आवड. शाळेच्या स्नेहसंमेलनामधून गायन, निवेदन, नकला, अभिनय असे सर्व प्रकार दादूस करायचा. दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती.

देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात. गाण्याचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला. कोणतेही शास्त्रीय संगीताचे धडे न घेता आगरी कोळी लोकसंगीताला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला.  

“आई तुझा लालुल्या” गाण्याने दादूस ही खरी ओळख मिळाली. लहानपणी दोन्ही पायांमध्ये अपंगत्व होतं मात्र आईने दादूसची सेवा केली आणि दादूसला दोन्ही पायांवर उभं केलं. बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून दादूसची आज स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूसचा पेहराव, डोळ्यावर काळा गॅागल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चेन, पाचही बोटात अंगठ्या हा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांच्यासारखा असल्याने मराठीतील बप्पी लहिरी म्हणूनच दादूसला ओळखलं जातं. बप्पीदा हे दादूसचे संगीतातील आदर्श आहेत. 

कोळी गीताचे संगीतकार स्व. आनंद पांचाळ यांना दादूस गुरुस्थानी मानतात. माईक हातात कसा धरावा इथपासून गायनाचे अनेक बारकावे त्यांनी दादूसला शिकवले. कोळीगीते- लोकगीते हा दादूसचा पहिला म्युझिक अल्बम. कृणाल म्युझिक कंपनीने तो प्रसिद्ध केला होता. ‘दादूस आला हळदीला’ हा दादूसचा म्युझिक अल्बम खूप गाजला. त्यामुळे दादूस हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. २००७ मध्ये दादूस ‘बंध प्रेमाचे’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकला. यामध्ये संगीतदिग्दर्शकाची भूमिका दादूसने साकारली होती. डिस्ने चॅनेल आणि एमटीव्हीच्या काही कार्यक्रमामध्ये देखील दादूस दिसला होता. 

कलर्स मराठीच्या ‘एकदम कडक’ या आदर्श शिंदेने होस्ट केलेल्या कार्यक्रमामध्ये दादूसने आपली कला सादर केली होती. नारळी पौर्णिमेनिमित्ताने झी मराठी वरील प्रसिद्ध ‘सारेगमप’ मध्ये दादूसला निमंत्रित केले होते. दादूस लाईव्ह शो देखील करतो. त्याच्या लाईव्ह शो ला प्रचंड गर्दी होते. मराठी- हिंदीतील अनेक कलाकार दादूसच्या गाण्याचे आणि पेहरावाचे चाहते आहेत. 
टॅग्स :बिग बॉस मराठी